(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hatkanangale Loksabha : हातकणंगलेत ठाकरेंची मशाल सुद्धा रिंगणात; सत्यजित पाटील सरुडकरांना उमेदवारी जाहीर
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये अखेर ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे हातकणंगलेची लढत चौरंगी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मुंबई : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये अखेर ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे हातकणंगलेची लढत चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज (3 एप्रिल) पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान राजू शेट्टी यांनी दोनवेळा मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा मागितला होता. मात्र, मशाल चिन्हावर त्यांनी नकार दिल्याने आणि मतदारसंघातून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर उमेदवार देण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले आणि सांगलीच्या जागेवरून संशयकल्लोळ सुरु होता. यामुळे हातकणंगलेमध्ये ठाकरे कटाकडून उमेदवार देण्यात येणार की नाही? याची चर्चा रंगली होती. मात्र, आता ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणी वंचितकडून सुद्धा उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभेला धैर्यशील माने उमेदवार असतील, तर स्वाभिमानीकडून राजू शेट्टी रिंगणात असतील, तर ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकर रिंगणात असतील.
त्यामुळे आता हातकणंगलेमध्ये चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचे उत्तर आता 4 जून रोजीच मिळणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा फिस्कटली का? याबाबत बोलताना सांगितले की, चर्चा फिस्कटली नाही. हातकणंगले आणि सांगलीची जागा आम्ही लढत असल्याचे ते म्हणाले. हातकणंगले हा मतदारसंघ शिवसेनेचा मतदारसंघ आहे. मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता आम्हाला कार्यकर्त्यांनी उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती. दरम्यान राजू शेट्टी यांना आम्ही पाठिंबा देऊ केला होता. मात्र, मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असा त्यांना प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी नकार दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता उमेदवार देण्यात आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या