Uday Samant : शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह; काका पुतण्याच्या गुप्त भेटीवरून उदय सामतांचा दावा
Uday Samant : अजित पवार आणि शरद पवार यांची जरी भेट झाली असली, तरी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
कोल्हापूर : महाविकास आघाडीचे सध्या जे काही राजकारण सुरु आहे त्यानुसार नेत्यांना स्वबळावर लढण्याची माहिती देखील देण्यात आली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांची जरी भेट झाली असली, तरी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. उदय सामंत आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना गुप्त भेटीवरून टीका केली.
उदय सामंत यांनी संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, विरोधकांकडे भरपूर वेळ आहे. असाच निवांत वेळ त्यांना पुढील वीस-पंचवीस वर्षे मिळो. त्यांना दुसरं काहीही काम नाही. रोजच ते बोलत असतात, रोजच त्यांचा इव्हेंट चालू असतो. आमच्या नेत्यांबद्दल नाराजी सांगणारी जी सूत्र आहेत त्यांचीच एसआयटी चौकशी लागली पाहिजे. सामंत यांनी सिनेट निवडणुकीवरून भाष्य केले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थी संघटनांनी जी निवडणूक यादी तयार केली आहे ती सदोष आहे. यामुळे हा प्रश्न कुलगुरूंकडे मांडण्यात आला होता. स्वतःच्या जागा निवडून येण्यासाठी कशा पद्धतीने मतदार यादी केली जाते हे महाराष्ट्र समोर आणणार आहे. बोगस यादी तयार केलेले दूर करण्याचं काम सध्या केलं जात आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीवर काय म्हणाले?
इंडिया आघाडीची बैठक घेऊन फार मोठं काही साध्य होईल असं मला वाटत नाही, असा उदय सामंत यांनी केला. भारत देशाबद्दल खरा अभिमान कोणाला आहे हे या देशातल्या जनतेला माहिती आहे. 370 कलम, राम मंदिर कोणी बांधलं आहे ते पाहिलं. भारताबद्दल खरा अभिमान हा नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाच आहे.
भरत गोगावलेंच्या वक्तव्यावर म्हणतात..
भरत गोगावले यांनी मंत्रिपदावरून केलेल्या वक्तव्यावरही उदय सामंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, भरत शेठ असे अनेक किस्से सांगतात ते माझे जवळचे मित्र आहेत. शेठ यांनी जे काही बोलले ते त्यांच्या भाषणाची शैली आहे ते कोणावरही नाराज नाहीत. कोणालाही दुखावण्यासारखं वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर राखणं हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर अखंड देशाची जबाबदारी आहे, शिवरायांच्या बाबतीत जर असं कोणी काही करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया बागलकोटमधील शिवरायांची पुतळा हटवण्यावरून दिली.
इतर महत्वाच्या बातम्या