(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : महापूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहणार! राजू शेट्टी उद्याच्या मोर्चावर ठाम
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, प्रोत्साहनपर अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
Raju Shetti : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, प्रोत्साहनपर अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्याचबरोबर अनुदानाचा लाभ घेताना घालण्यात आलेल्या अटींवरूनही राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.
या विरोधात येत्या उद्या 12 वाजता कोल्हापूरमधील दसरा चौकात एकत्र येण्याच आवाहन राजू शेट्टींनी केलं आहे. गट-तट, पक्ष विसरुन निर्णायक लढाईसाठी कोल्हापूरच्या दसरा चौकात उपस्थित राहा असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.
मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर आणि धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जाचक अटी रद्द करून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली, त्यानंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेतील जाचक अटी काढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याबाबत शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
राजू शेट्टी म्हणाले, शासन निर्णयापर्यंत लढा सुरुच राहणार
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उद्या आयोजित केलेल्या मोर्चाची हवा काढून घेतल्याची चर्चा आहे. या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता राजू शेट्टी यांनी सीएमओने ट्विट करू काही होत नसल्याची प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी असेच केले होते, पण त्यांनीही आमची फसवणूक केली. त्यामुळे शासन निर्णय या संदर्भात निघत नाही, तोवर आपला लढा सुरुच ठेवणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. उद्याच्या मोर्चावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.
धैर्यशील माने आणि प्रकाश आबिटकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी भेट घेतल्यानंतर नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही, याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. 2018-19 मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकाशत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Raju Shetti : निर्णायक लढाईसाठी एकत्र या, 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी राजू शेट्टींचा एल्गार
- Cm Eknath Shinde : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान मिळणार, शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
- Prakash Abitkar : जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान द्या, प्रकाश आबिटकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट