Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथील तुषार पांढरबळे या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील भेंडवडेमध्ये वारणा नदीपात्रात चौथ्या दिवशी सापडला. मयत तुषारचा मूळ ठिकाणापासून तब्बल 40 किमी दूर वारणा नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला. तुषारने प्रेम प्रकरणातून शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरुन वारणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात उडी मारली होती.

Continues below advertisement


प्रेम प्रकरणातून मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत त्याने उडी घेतली होती. नदीचे पाणी पात्राबाहेर असल्याने शनिवारी रात्र झाल्याने शोध घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी एनडीआरएफच्या 20 जणांच्या पथकाने शोध सुरु केला. दरम्यान, वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पातळी कमी झाली होती. पाण्याची पातळी सुमारे सात फुटांनी कमी आल्याने पाणी पात्रात गेले होते. 


बिळाशी या मूळ गावी अंत्यसंस्कार


मांगले बंधाऱ्यापासून चिकुर्डे बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रात दिवसभर दोन यांत्रिक बोटीतून शोधमोहीम राबवली. मात्र, त्यांना तुषार आढळून आला नाही. तिसऱ्या दिवशी तुषारच्या नातेवाईक आणि मित्रांनी वारणा नदीच्या दोन्ही बाजूंनी शोध घेतला, मात्र सापडला नाही. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे (जि. कोल्हापूर) येथील इनामदार पाणंद रस्त्याजवळील वारणा नदीपात्रात तरंगताना आढळून आला. नातेवाईकांनी याबाबतची माहिती वडगाव पोलिसांना दिली. डॉक्टरांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री त्याच्यावर बिळाशी या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. 


मला शोधण्याचा प्रयत्न करु नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही


तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. तो मांगलेमध्ये आजोळी आईसह रहात होता. तो मांगलेत खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. वारणा नदीत उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलच्या स्टेटसला मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहिन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा मजकूर ठेवला होता. 


मासेमारी करणाऱ्या लोकांकडून अडवण्याचा प्रयत्न


6 ऑगस्ट रोजी दुपारी तो तीनच्या सुमारास मांगले सावर्डे बंधाऱ्याकडे तुषार गेला. त्याचे बंधाऱ्यावर बराच वेळ मोबाईलवर कोणाशी तरी बोलणे सुरु होते. त्यानंतर त्याने नदीत उडी मारली. त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तुषारने उडी मारल्यानंतर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात तो दिसेनासा झाला. मांगल्याचे पोलीस पाटील संजय कांबळे यांनी घटनेची माहिती शिराळा पोलीस ठाण्यात दिली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या