Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील मांगले आणि सावर्डे बंधाऱ्यावरून तरुणाने मोबाईलला स्टेटस ठेवून नदीत उडी मारली आहे. ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. तुषार गणपती पांढरबळे (वय 24) असे त्याचे नाव आहे. त्याच्या स्टेटसवरून त्याने नाजूक प्रकरणातून टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. वारणा नदीत शोध घेण्यासाठी आज (6 ऑगस्ट) सकाळी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे.


मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही


तुषार हा मूळचा बिळाशीचा आहे. तो मांगलेमध्ये आजोळी आईसह रहात होता. तो मांगलेत खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. वारणा नदीत उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलच्या स्टेटसला मला शोधण्याचा प्रयत्न करू नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहिन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा मजकूर ठेवला होता. 


मासेमारी करणाऱ्या लोकांकडून अडवण्याचा प्रयत्न


काल (6 ऑगस्ट) दुपारी तो तीनच्या सुमारास मांगले सावर्डे बंधाऱ्याकडे तुषार गेला. त्याचे बंधाऱ्यावर बराच वेळ मोबाईलवर कोणाशी तरी बोलणे सुरू होते. त्यानंतर त्याने नदीत उडी मारली. त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तुषारने उडी मारल्यानंतर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात तो दिसेनासा झाला. मांगल्याचे पोलीस पाटील संजय कांबळे यांनी घटनेची माहिती शिराळा पोलीस ठाण्यात दिली. शिराळा पोलीस घटनास्थळी आले. मात्र, वारणा नदीचे पात्र मोठे विस्तीर्ण आहे, त्यामुळे तुषारला शोधणे अवघड झाले आहे. बंधाऱ्याखाली पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो किती दूर गेला आहे, हे समजणे कठीण आहे.


मुलाचा कुऱ्हाडीने खून करून कटरने तुकडे करत तलावात फेकले


दरम्यान, दारुड्या मुलाला कंटाळून बापानेच कुऱ्हाडीने खून करून नंतर मृतदेहाचे कटरच्या सहाय्याने तुकडे केले आणि ते तलावात फेकल्याची घटना मिरजमध्ये दोन दिवसांपूर्वी घडली. राजेंद्र यल्लाप्पा हंडिफोड (वय 50, रा. गणेश तलाव लक्ष्मी मंदिर, मिरज) असे निर्दयी बापाचे नाव आहे. रोहित राजेंद्र हांडीफोड (वय 30) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. बापाने मिरज शहर पोलिसांत हजर होऊन खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांची पळापळ सुरू झाली.


सुभाष नगर, शिंदे हॉलजवळ राजेंद्र हंडीफोडचा मालकीचा प्लॉट आहे. या ठिकाणी राजेंद्रने मुलगा रोहितचा खून करून तुकडे करून पोत्यात भरले आणि काही शरीराचे तुकडे गणेश तलाव येथे आणून टाकले. रोहितला दारु आणि जुगाराच्या आहारी गेला होता. त्यामुळे व्यसनासाठी रोहित कुटुंबाला त्रास देत असल्याने बापाने कायमचा काटा काढण्यासाठी खून केला. या घटनेनंतर बापाच्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा पश्चातापाचा लवलेश जाणवत नव्हता.


इतर महत्वाच्या बातम्या :