Sangli News : सांगलीतील (Sangli) मिरजमधील उद्धव ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शहर प्रमुखांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून (ED) चौकशी झाल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत मैंगुरे (Chandrakant Maingure) असे या मिरज शहर प्रमुखाचे नाव असून एकदा मैंगुरे यांची याआधी चौकशी झाली असून पुढील चौकशीसाठी पुन्हा कार्यालयात हजर राहण्याबाबत ईडीकडून कळवण्यात आले आहे. 


1 सप्टेंबरपर्यंत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश


सांगली शहरामध्ये दोन महिन्यांपूर्वी व्यापारी पारेख बंधूंच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. या छाप्याप्रकरणी चंद्रकांत मैंगुरे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. 6 जुलै रोजी त्यांची चौकशी झाली असून आता पुन्हा 1 सप्टेंबरपर्यंत मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याबाबत फोनवरुन सांगण्यात आल्याचं चंद्रकांत मैंगुरे यांनी सांगितलं आहे. तसेच आपली जागा पारेख बंधूंना विकण्यात आली होती. त्याबाबत आपले त्यांच्याशी देवाणघेवाण झाल्याचंही मैंगुरे यांनी स्पष्ट केलं आहे.


सांगलीतील पारेख बंधूंच्या घरावर 23 जून रोजी ईडीचा छापा


सांगली शहरात 23 जून रोजी सकाळी ईडीने पारेख बंधूंच्या घरावर छापा टाकला होता. ईडीची दोन पथकांनी शिवाजीनगरमधील सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात चौकशी केली. ईडीच्या दोन पथकातील अधिकाऱ्यांनी पारेख बंधूंच्या जनशांती आणि विश्वास या दोन बंगल्यात सकाळी छापा टाकला. आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरुन ही चौकशी केली होती. पारेख बंधूंच्या दोन बंगल्यामध्ये चौकशी करण्याबरोबरच ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काही बँकांमध्ये जाऊन पारेख बंधूंशी संबंधित खात्याची चौकशी देखील केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे याच व्यावसायिकांवर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेतून सीमा शुल्क आणि व्हॅटच्या पथकांनी छापे टाकले होते. तर जीएसटी विभागाने कर वसूल केला असल्याची माहिती आहे.


पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. या पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे. सांगली शहरातील गणपती पेठ भागात त्यांची इलेक्ट्रिकल्सची दुकान आहेत. त्यांचे शिवाजीनगर परिसरात बंगले आहेत. सांगलीतील पारेख बंधुंच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


याआधी 20 लाखांच्या चेक चोरी प्रकरणात मैंगुरे यांना अटक


दरम्यान कंपनीच्या चेकबुकमधून 20 लाख रुपयांचा चेक चोरी केल्या प्रकरणात चंद्रकांत मैंगुरे यांना जुलै 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. मिरज शहरातील एका कंपनीच्या जुन्या चेकबूक पुस्तकातून 20 लाखाचा चेक चोरुन त्यातील 15 लाख 17 हजार 205 लंपास केल्याचा आरोप मिरज ठाकरे गटाचे (तेव्हाच्या शिवसेना) शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांच्यावर होता. 


हेही वाचा


Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात आटपाडी तालुक्यातील दोन नेत्यांत खडाजंगी