Kolhapur News : कंत्राटी भरतीविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी परिषद आक्रमक, उद्या इचलकरंजी फाट्यावर रास्ता रोको; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
सरकारी नोकर भरती ही स्पर्धा परीक्षा ऐवजी कंत्राटी पद्धतीने करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याने खासगी कंपनीची मक्तेदारी वाढेल. याच्या निषेधार्थ विद्यार्थी परिषदेकडून रास्ता रोको करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : सरकारी कंत्राटी भरतीविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेने (swabhimani vidyarthi parishad) उद्या (18 सप्टेंबर) रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. विद्यार्थी परिषदेच्या राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा पत्र लिहित कंत्राटी नोकर भरती धोरणाचा फेरविचार करा, अन्यथा महाराष्ट्रभरात उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. सौरभ शेट्टी यांनी म्हटले आहे की, "सरकारी नोकर भरती ही स्पर्धा परीक्षा ऐवजी कंत्राटी पद्धतीने करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याने खासगी कंपनीची मक्तेदारी वाढेल. याच्या निषेधार्थ उद्या उद्या सोमवारी (18 सप्टेंबर) सकाळी 9 वाजता इचलकरंजी फाटा, धर्मनगरमध्ये स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून शेकडो तरुणांसह रास्ता रोको करून निषेध करणार आहे."
राज्य सरकारला खेळ खेळायचा आहे का?
दरम्यान, सौरभ शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "राज्य सरकारने नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आणि सुशिक्षित बेकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याचे उराशी बाळगलेल्या स्वप्नांशी राज्य सरकारला खेळ खेळायचा आहे का?" "पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी एक कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे पुढे काय झाले हे अद्याप तरुणांना समजलेलं नाही. तोवर महाराष्ट्रामध्ये सरकारी भरतीसाठी कंत्राटी धोरण अवलंबून तरुणांच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीला मिळणार आहेत. चुकीचा पायंडा पाडण्याच्या निर्णयाने तरुणांमध्ये नैराश्य वाढत जाण्याचा मोठा धोका आहे. यातून आपल्याला युवकांच्या होणाऱ्या आत्महत्या पाहावयाच्या आहेत की का?" असा सवालही केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन असह्य झाले आहे. सर्वसामान्यांची मुले सरळसेवा परीक्षेसाठी जीवतोड अभ्यास करीत आहेत. याला कुठेतरी राज्य सरकारकडून छेद देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या अशा धोरणाविरुद्ध बंड पुकारून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विद्यार्थी परिषद रस्त्यावरची लढाई हाती घेईल, असा इशाराही सौरभ शेट्टी यांनी पत्रातून दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या