(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime : नात्यानं मेव्हणे-पाव्हणे अन् धंदा इनोव्हातून शेळ्या चोरणे! सराईत गुन्हेगार अटकेत, तीन फरार
Kolhapur Crime : कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मेव्हण्या पाहुण्याच्या टोळीकडून अलीशान इनोव्हासह 16 बोकड तसेच शेळ्या असा 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Kolhapur Crime : अलीशान इनोव्हा गाडीतून रस्त्यावरील शेळ्या बोकड चोरणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मोठी कारवाई करताना या टोळीकडून इनोव्हासह 16 बोकड तसेच शेळ्या असा 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शिवाजी पांडूरंग कुंभार (वय 38 रा. कनाननगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. किशोर नागाप्पा गायकवाड (उजळाईवाडी, ता. करवीर जि. कोल्हापूर), दिपक शिवाजी गायकवाड (रा. यादववाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) राजू बागल (रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा), अशी पसार असलेल्या संशयित साथीदारांची नावे आहेत.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्ट रोजी हातकणंगले तालुक्यातील नागाव गावच्या हद्दीमध्ये चौगले मळ्यात अज्ञाताने उलगप्पा हणमंता अलकुंटे यांच्या मालकीच्या 90 हजारांच्या शेळ्या व बोकड चोरले होते. या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस संभाजी भोसले यांना मिळालेल्या माहितीवरुन सराईत गुन्हेगार शिवाजी कुंभारला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आणखी तीन साथीदारांच्या मदतीने नागाव गावच्या हद्दीतून तसेच करवीर तालुक्यातील गिरगाव ते पाचगाव मार्गावरून शेळ्या व बोकड चोरल्याची कबुली दिली.
हे गुन्हे करण्यासाठी त्यांनी इनोव्हा गाडीचा वापर केल्याचेही समोर आले. त्याच्या चौकशीतून किशोर गायकवाड, दिपक गायकवाड, राजू बागल अशी साथीदारांची नावे समोर आली. अटकेतील शिवाजी कुंभारचे किशोर व दिपक हे मेहुणे आहेत. पोलिसांन संशयित किशोर गायकवाडच्या उजळाईवाडीतील घरावर छापा टाकत चोरीच्या 16 शेळ्या, बोकड व गुन्ह्यातील आलिशान मोटार जप्त केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी भोसले, राजीव शिंदे, बालाजी पाटील, रणजित पाटील, प्रदीप पाटील यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या