SSC Exam : उद्यापासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ; कोल्हापूर जिल्ह्यात 53 हजार 675 परीक्षार्थी
SSC Exam : दहावीच्या परीक्षेला उद्यापासून (2 मार्च) सुरुवात होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 976 शाळांतील 53 हजार 675 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
SSC Exam : विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून (2 मार्च) सुरुवात होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी (SSC Exam) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर जिल्ह्यात (Kolahpur News) 136 परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. त्यात मुख्य, उपकेंद्रांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 976 शाळांतील 53 हजार 675 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे.
विद्यार्थ्यांनी केंद्रावर वेळेत पोहोचावे
दरम्यान, बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेसाठी (SSC Exam) काही नियमात शिक्षण मंडळाने सुधारणा केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रातील पेपरसाठी साडेदहा वाजता, दुपारच्या सत्रातील पेपरसाठी अडीच वाजता या निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचावे. त्यांची बैठक व्यवस्था असलेल्या केंद्राची माहिती आज (1 मार्च) जाणून घ्यावी. परीक्षेची तयारी शिक्षण मंडळाकडून पूर्ण झाली आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय प्रभारी सचिव डी. एस. पवार यांनी दिली आहे.
'बारावी'च्या उत्तरपत्रिका तपासणी ठप्प
दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातील सुमारे 6 लाख उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम ठप्प आहे. आतापर्यंत बारावीचे पाच पेपर पार पडले आहेत. आंदोलक शिक्षकांचा महासंघ आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतर पेपर तपासणीचे का सुरु होण्याची शक्यता आहे.
कलम 144 लागू असणार
दरम्यान, इयत्ता दहावी व बारावी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी कोल्हापुरात परीक्षा केंद्र परिसरात 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीत (ज्या दिवशी पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू असणार आहे. यानुसार मोबाईल फोन आणि त्यासंबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/ वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन आणि लॅपटॉप यांचा वापर करण्यास अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहणार आहेत. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना आणि त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही.
दरम्यान, राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात 'कॉपीमुक्त अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानात राज्याचा 'नोडल अधिकारी' म्हणून शिक्षण आयुक्त यांना आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तसंच 'समन्वयक अधिकारी' म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI