shahu karkhana kagal : कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वोत्तम कारखाना ठरला आहे. देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचा वसंतदादा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी गळीत हंगाम 2021-22 साठी शाहू साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. 


आतापर्यंत तीनदा या पुरस्कारावर शाहू साखर कारखान्याने मोहोर उमठवली आहे. हा मानाचा पुरस्कार तिसऱ्यांदा प्राप्त झाल्याबद्दल शाहू कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्यासह कारखान्याच्या सर्व घटकांचे अभिनंदन समरजितसिंह घाटगे यांनी केलं आहे. 


त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कारखान्याच्या यशाची, किर्तीची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. जी सहकाराची भावना मनात ठेऊन स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कारखान्याची स्थापना केली, ती भावना जपण्यात कारखान्याचा प्रत्येक सदस्य आपले योगदान जपत आहे, याचा आनंद आहे.  


समरजितसिंह घाटगे पुढे म्हणतात की, कारखान्याला मिळालेला हा 66 वा पुरस्कार म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताच्या कृतीचा वारसा, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कारखाना चालवण्यासाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, तसेच कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांचे मार्गदर्शन, सभासद, शेतकऱ्यांनी विश्‍वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ, व्यवस्थापनाच्या नियोजनास अधिकारी-कर्मचारी यांच्या कष्टाची जोड याचा हा गौरव आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात कारखान्याचा झालेला हा गौरव म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन आहे. 



इतर महत्त्वाच्या बातम्या