Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यामध्येही लम्पी चर्मरोगाचा पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावात पहिल्यांदा लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आता शिरोळ तालुक्यातही लम्पी चर्मरोगाने पाय पसरले आहेत. शिरोळ तालुक्यातील शिरढोण, टाकवडे, हरोली परिसरात 15 जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झाली आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील दहा किलोमीटर परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. हरोली व शिरढोणला काही गायींना ताप येऊन अंगावर फोड आले आहेत. 


शिरोळमधील हरोली येथे 6 गायी, तर शिरढोण-टाकवडे परिसरात 9 जनावरे लम्पीग्रस्त आढळली. जिल्हा प्रशासन तत्काळ शिरढोण, टाकवडे, शिवनाकवाडी, शिरदवाड, अब्दुललाट, तमदलगे व निमशिरगाव या गावांत गुरुवारपासून लसीकरणाला सुरुवात करणार आहे. शिरढोण येथे लम्पी प्रतिबंधात्मक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. 


कसबा सांगाव (ता. कागल) येथील वाकी वसाहतीतील गायीला लम्पीसद़ृश लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना याची माहिती देण्यात आली आहे. गायीला ताप असून, शरीरावर काही ठिकाणी ठिपके आढळले आहेत. शेतकर्‍यांनी घाबरून न जाता, या आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे. लम्पीसद़ृश लक्षणे दिसून आल्यास तत्काळ आपापल्या गावांतील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र कुरूंदवाडे यांनी केले आहे.


राज्यातील सर्व पशुधनाचा 10 दिवसांमध्ये विमा उतरवा


दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी येत्या 10 दिवसांमध्ये लसीकरणाचा साठा उपलब्ध करून राज्यातील सर्व पशुधनाचे केंद्र व राज्य सरकारकडून तातडीने विमा उतरविण्याची मागणी केली आहे.  राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र सरकारकडे केली आहे. 


त्यांनी म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन ज्याप्रमाणे कोरोना काळात कमी हप्त्यामध्ये जनतेला विमा उपलब्ध करून दिला, त्याचप्रमाणे राज्यातील सर्वच जनावारांचा येत्या दहा दिवसात तातडीने विमा उतरविण्यात यावा. जेणेकरुन एखादे जनावरे दगावल्यास संबंधित पशुपालकास होणाऱ्या नुकसानीचे अर्थसहाय्य मिळून त्या कुटुंबास आधार मिळेल.


गोकुळ करणार मोफत लसीकरण 


दुसरीकडे लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर प्रशासनाकडून मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जनावरांचा बाजार भरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता गोकुळनेही पशूधन असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोकुळच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीचा पुरवठा करून लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या