Narsobawadi : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा पार पडला. दक्षिणद्वार सोहळा आज गुरुवारी झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून झालेल्या दमदार पावसाने तसेच कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मोसमात तिसऱ्यांदा दत्त मंदिर पाण्याखाली गेले. यापूर्वी 12 जुलै रोजी दक्षिणद्वार सोहळा झाला होता. 


दत्त मंदिरात पाणी आल्यानंतर आज पहाटे ५ वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दिवसभर दक्षिणद्वार सोहळा राहिल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी केली. दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याने देवस्थान समितीकडून सर्व साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुख्य मंदिरामध्ये पाणी आल्याने श्रींची मूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी महाराज मंदिरात ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे  नृसिंहवाडी व औरवाड गावाला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.


दक्षिणद्वार सोहळा म्हणजे काय?


नरसोबावाडीत कृष्णा नदी उत्तरेकडून येत दक्षिणेकडे वाहत जाते. यावेळी उत्तरेकडून वाहणारे पाणी पादुकांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून मार्गस्थ होते. याचवेळी अनेक भाविक या पवित्र स्नानाचा लाभ घेतात त्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. 


पंचगंगेच्या पाणी पातळीत घट


दरम्यान, कालपासून पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. आज सकाळी राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 28 फुट 10 इंच इतकी होती. जिल्ह्यातील गेल्या 24 तासात 22 बंधाऱ्यांवर पाणी उतरले असून आता एकूण 26 बंधारे पाण्याखाली आहेत. 


कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 43.7 मिमी पाऊस झाला. 


24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये 



  • हातकणंगले-1.5 

  • शिरोळ -1 

  • पन्हाळा-5.6 

  • शाहूवाडी-17.7

  • राधानगरी-11.5 

  • गगनबावडा-43.7 

  • करवीर-4.5 

  • कागल-4.4  

  • गडहिंग्लज-5.2

  • भुदरगड- 15 

  • आजरा-14.8 

  • चंदगड-17.9 


इतर महत्वाच्या बातम्या