Kolhapur Shivsena: कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांची नाराजी कायम; निर्धार मेळाव्याला दांडी मारली
Kolhapur Shivsena: शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी रविकिरण इंगवले यांच्यासह अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे सुद्धा इच्छुक होते. मात्र, इंगवले यांच्या गळ्यामध्ये पदाची माळ पडली आणि नाराजीचा स्फोट झाला.

Kolhapur Shivsena: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटातील दुफळी कायम आहे. जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांच्या निवडीनंतर नाराज झालेल्या शिवसेना उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचा निर्धार सुद्धा व्यक्त केला होता. मात्र, आज (20 जुलै) शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा कोल्हापूरमध्ये होत असताना संजय पवार यांनी मात्र दांडी मारली आहे. त्यामुळे संजय पवार यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून पदाधिकाऱ्यांमध्ये विसंवाद दिसून येत आहे. पदाधिकारी निवडीवरून चांगलीच दुफळी निर्माण झाली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा होत असताना या मेळाव्यामध्ये तरी पदाधिकाऱ्यांची एकी दिसून येईल असं वाटत असतानाच संजय पवार यांनी अनुपस्थित राहत आपली नाराजी कायम असल्याचे दाखवून दिलं आहे. आज कोल्हापूरमध्ये माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनामध्ये निर्धार मेळावा सुरू आहे. या निर्धार मेळाव्याला नितीन बानगुडे पाटील संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर देखील उपस्थित आहेत. मात्र संजय पवार यांची नाराजी अनुपस्थितीमुळे दिसून आली.
शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा
शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी रविकिरण इंगवले यांच्यासह अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे सुद्धा इच्छुक होते. मात्र, इंगवले यांच्या गळ्यामध्ये पदाची माळ पडली आणि नाराजीचा स्फोट झाला. हर्षल सुर्वे यांनी तातडीने पक्षाचाच राजीनामा देत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला, तर संजय पवार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आणि शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांनी आपण कुठेही जाणार नसून उद्धव ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेना ठाकरे गटाची अवस्था तोळामासाची आहे. एका बाजूला नेते आणि दुसऱ्या बाजूला पदाधिकारी अशी स्थिती असताना पक्षाने एकसंधपणे काम करणं गरजेचं होतं. मात्र पदाधिकाऱ्यांमधील विसंवादाने पक्षाची वाताहत होत चालली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्येही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
इंगवले आणि संजय पवार यांच्यामध्ये वाद
इंगवले आणि संजय पवार यांच्यामध्ये वाद गेल्या अनेक दिवसांपासून रंगला असून त्यामध्ये अजूनही पक्ष नेतृत्वाला कोणताही तोडगा करता आलेला नाही. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीवरूनही दोघांमध्ये वाद रंगला होता. इतकेच नव्हे तर रविकिरण इंगवले यांनी संजय पवार यांच्याशी झालेला वादाचा ऑडिओ कॉल सुद्धा व्हायरल केला होता. यावरून सुद्धा दोघांमध्ये चांगलीच कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे रविकिरण इंगवले आणि संजय पवार यांच्या वादाचा फटका पक्षाला बसू नये अशीच अपेक्षा कोल्हापुरातील सामान्य शिवसैनिक व्यक्त करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























