Kolhapur: शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा राज्यात डंका!
पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलांनी राज्यभर डंका वाजवला आहे. या मुलांनी निकालातून चांगलीच चपराक दिली आहे.
Kolhapur News : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (pre-higher primary and pre-higher secondary scholarship examination) कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलांनी राज्यभर डंका वाजवला आहे. मनपा, झेडपी शाळेसाठी नाके मुरडली जात असताना या मुलांनी मिळवलेल्या यशाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात अव्वल राहिला असून यश मिळवणारी मुल ग्रामीण तसेच दुर्गम भागातील आहेत. त्यामुळे या यशाचा आनंद मोठा आहे. परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. पाचवीच्या परीक्षेत 41.63 टक्के, तर आठवीच्या परीक्षेत 28.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा हाच निकाल 12.53 टक्के इतका लागला आहे. पाचवीचे 591, तर आठवीचे 571 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (ग्रामीण) राज्याच्या यादीमधील 102 पैकी 33 तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (ग्रामीण )121 पैकी 40 मुले कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील यंदा पाचवीपेक्षा आठवीचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचे प्रमाण जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी चालू वर्षातही शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने 31 जुलै 2022 रोजी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
भुदरगड तालुक्यातील नांदोली प्राथमिक शाळेची निकालात भरारी
दरम्यान, जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागामध्ये नांदोली प्राथमिक शाळा आहे .या शाळेचे 8 पैकी 2 राज्य गुणवत्ता यादी व इतर ३ शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इतर सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. राज्यात गुणवत्ता यादीत सृष्टी कुंडलिक पाटील या विद्यार्थिनीने सातवा, तर स्वरूपा दत्तात्रय पाटील आठव्या क्रमांकावर राहिली.
हर्षवर्ध रविंद्र पाटील, लावण्या साताप्पा पाटील ,स्नेहल भाऊसो पाटील, राधिका मारुती अस्वले हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. नांदोली प्राथमिक शाळेत अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत नाव चमकवत आहेत. यासाठी वेळोवेळी त्यांना पालक शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची व मार्गदर्शक शिक्षकांची गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक सुरेश परसू शेवळवाडकर, शिक्षक मारुती गोडसे, संतोष डाकरे, सुप्रिया तावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासो पाटील, धनाजी रेपे, मानसिंग पाटील, भिकाजी अस्वले ,प्रतिभा बागडे, सुमन पाटील ,कुंडलिक पाटील, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या