Sangli Crime : बनावट सोन्याच्या चेन देऊन इस्लामपुरातील व्यापाऱ्याला गंडा, कोल्हापुरातील दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल
बनावट सोने देऊन गंडा घालणाऱ्या कोल्हापुरातील दोन भामट्यांविरोधात इस्लामपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी बनावट सोन्याचे दागिने देत 3 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
Sangli Crime : बनावट सोने देऊन गंडा घालणाऱ्या कोल्हापुरातील दोन भामट्यांविरोधात इस्लामपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामपूर बसस्थानक परिसरातील व्यापाऱ्यास या दोघांनी बनावट सोन्याचे दागिने देत 3 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. नितीन मनोहरलाल भंडारी यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर विनोद पारसमल भंडारी (रा. बिंदू चौक,कोल्हापूर) आणि विरेश ऊर्फ लोकेश आण्णाप्पा कुरले (रा. ऐश्वर्या पार्क, कोल्हापूर) या दोघांविरुद्ध (Kolhapur News) फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद आणि विरेश 31 जानेवारीला इस्लामपुरात नितीन भंडारी यांच्याकडे आले. यावेळी विनोदने विरेशच्या आईच्या उपचारासाठी 5 लाख रुपयांची गरज असल्याचे सांगत त्याच्याकडील 83 ग्रॅम वजनाच्या हॉलमार्कच्या दोन साखळ्या ठेवून पैशाची मागणी केली.
नितीन भंडारी यांनी परतफेड करण्याच्या अटीवर दोघांना 3 लाख 25 हजार दिले. साखळ्या ठेवण्यासाठी आल्यानंतर पाहणी केली असता त्या बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे नितीन भंडारी यांनी दोघांकडे पैशाची मागणी केल्यावर दोघांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन भंडारी यांनी पोलिसात फिर्याद दिली.
तरुणाची फसवणूक
दरम्यान, सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) खोटे लग्न लावून 4 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्नाटकच्या नववधूसह पाचजणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बामणी (ता. खानापूर) येथील नवरदेव दीपक शिवाजी सावंत (वय 39) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नववधू लक्ष्मी मल्लाप्पा नलवडे (रा. बैलहोंगल, कर्नाटक), अंजना दिलीप मलाईगोल (रा. हुपरी, जि. कोल्हापूर), शिवानंद मठपती स्वामी, त्याची पत्नी (दोघेही रा. गोकाक, ता. बेळगाव) व उमेश वाजंत्री या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्यानंतर दीपकने गावातील काही लोकांना बोलवून चर्चा झाल्यानंतर रोख 3 लाख 10 हजार दिले होते. तसेच नवरदेव दीपकने दीड लाखांचे दागिने करून 18 नोव्हेंबर 2022 रोजी बामणीत विवाह केला. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी गावची यात्रा असल्याचे सांगत नववधू लक्ष्मीला नातेवाईक माहेरी घेऊन गेले. त्यानंतर ती बामणीला आलीच नाही. त्यामुळे नववधू आणण्यासाठी गेल्यानंतर दीपकशी वाद घालून त्याला परत पाठवण्यात आले. त्यानंतर त्याने फसवणूक झाल्याचे समजताच पोलिसांकडे धाव घेतली.
इतर महत्वाच्या बातम्या