Kolhapur News: सीपीआरच्या प्रवेशद्वारावर आता केवळ हाणामारी होणं बाकी; सुरक्षारक्षकांची दररोज रुग्णांच्या नातेवाईकांसोबत हुज्जत
सीपीआर परिसरात अंतर्गत कामे सुरू असल्याने रुग्णांसह नातेवाईकांची गैरसोय होत असतानाच आता गेटवरून प्रवेश करताना सुद्धा दररोज हुज्जत घालूनच सीपीआरमध्ये प्रवेश करावा लागत आहे.

CPR Kolhapur: फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठीच सांगली, साताऱ्यासह तळकोकणसाठी सुद्धा आधारवड असलेल्या सीपीआरमधील गैरसोयीमध्ये भर पडत चालली आहे. सीपीआर परिसरात अंतर्गत कामे सुरू असल्याने रुग्णांसह नातेवाईकांची गैरसोय होत असतानाच आता गेटवरून प्रवेश करताना सुद्धा दररोज हुज्जत घालूनच सीपीआरमध्ये प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी मारहाण फक्त व्हायची बाकी राहिली आहे अशी म्हणायची वेळ आली आहे. सीपीआर परिसर आता संवेदनशील झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच सीपीआरसमोरील जुन्या कौटुंबिक न्यायालयामध्ये सुरू झालं आहे. त्यामुळे हा भाग पूर्णपणे नो हाॅकर्स आणि नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये येणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत.
सीपीआरमध्ये येणारी वाहने दररोज शेकडोच्या घरामध्ये आहेत. रुग्ण उपचार घेत असल्याने संबंधित रुग्णांचे नातेवाईक सीपीआर परिसरामध्ये येत असतात. मात्र प्रवेशद्वारावर सर्किट बेंच असल्याने दररोज वादावादी होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दररोज वादाचे प्रसंत होत आहेत. या जवानांची दररोजची हुज्जत त्या प्रवेशद्वारावर दिसून येत आहे. त्यामुळे अॅडमिट रुग्णाची काळजी घेताना यांचीच डोकेदुखी जास्त वाढल्याचे चित्र दररोज सीपीआरच्या प्रवेशद्वारावर दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये प्रवेश करायचा तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोरीच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या
दुसरीकडे, अंतर्गत रस्ते सुद्धा सुरू असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे कमी म्हणून की काय रुग्णालय परिसर भटक्या, निराधार लोकांचा सुद्धा निवारा होऊन गेला आहे. ते कुठेही बसलेले असतात. त्यामुळे सुद्धा नातेवाईक भेदरून गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. साहित्यांची चोरी होत असल्याने नातेवाईकांची अडचण निर्माण झाली आहे. रुग्णालयाच्या परिसरात दारुडे, बेवारस, निराधारांनी मोठ्या प्रमाणात आश्रय घेतल्याने या लोकांचा सुद्धा बंदोबस्त करावा अशी सुद्धा मागणी सातत्याने नातेवाईक करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























