Raju Shetti : सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर, सत्तेत आल्यानंतर तीच काठी शेतकऱ्यांच्या पाठीत; राजू शेट्टींचा खोचक टोला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना खोचक शब्दात फटकारले आहे. शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात, असा टोला त्यांनी लगावला.
Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना खोचक शब्दात फटकारले आहे. शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात व सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहून समाधान वाटले, पण हेच विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत होते तेव्हा भूमीअधिग्रहण दोन टप्प्यातील एफआरपी यासारखे शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारी निर्णय घेताना यांच्यातील शेतकरी प्रेम विधीमंडळाच्या कोणत्या खुंटीला टांगले होते? तेव्हा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर सभागृहात गोंधळ घातला आणि सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर मूग गिळून गप्प का आहेत? शेतकऱ्यांनो राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात आणि सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात.
कांद्याचे दर घसरल्याने सभागृहात घमासान
दरम्यान, कांद्याचे पडलेले दर (Onion) तसेच 'नाफेड' मार्फत बंद असलेली कांदा खरेदी तसेच निर्यात बंदीवरुन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी जोरदार गोंधळ झाला. याच मुद्यावरुन विधान परिषदेचे कामकाज पहिल्यांदा दोनवेळा नंतर संपूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले. विधानपरिषदेतही जोरदार गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज सुरु होण्याआधी विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर कांद्याच्या माळा गळ्यात घालून निदर्शने केली.
विधानसभेत 'नाफेड'मार्फत कांदा खरेदी सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde on Onion Price) यांनी कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असे सांगितले. मात्र, यावर विरोधकांचे समाधान न झाल्याने सभागृहात गोंधळ झाला. 'नाफेड'मार्फत खरेदी सुरु नसल्याचं सांगत विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती असेल, तर हक्कभंग आणा, असे आव्हान दिले.
विरोधकांकडून प्रश्नांची सरबत्ती
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कांदा, कापूस, हरभरा, द्राक्ष, सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. काही शेतकऱ्यांनी पैसे मिळत नाहीत म्हणून आत्महत्या केल्याचे प्रकार घडत आहेत. यातून मार्ग काढायचा असेल, तर केंद्र सरकारला राज्य सरकारने मध्यस्थी करुन मागणी केली पाहिजे. या विषयावर सगळे कामकाज थांबून चर्चा करायला हवी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर खपवून घेतला जाणार नाही असे सांगत तातडीने कांदा खरेदीचे धोरण जाहीर केले पाहिजे अशी मागणी केली. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी आमदार प्रचंड आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
इतर महत्वाच्या बातम्या