Raju Shetti : राजू शेट्टी महाविकास आघाडीला म्हणतात, जाता जाता शेतकऱ्यांच्या 'या' तीन मागण्या पूर्ण करा, त्यांचा आशीर्वाद लागेल!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी तीन मागण्या पूर्ण केल्यास आपल्याला शेतकरी आपल्याला दुवा देईल असे म्हटले आहे.
Raju Shetti : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी राहणार की जाणार? या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे. सरकार टिकवण्यासाठी महाविकास आघाडीकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गेलेल्या आमदारांना परतण्यासाठी शिवसेनेकडून कारवाईचा कडक संदेश देण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी तीन मागण्या पूर्ण केल्यास आपल्याला शेतकरी आपल्याला दुवा देईल असे म्हटले आहे. राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनो आता तरी शहाणे व्हा. जाता जाता उसाची एकरकमी एफआपी व भूमी अधिग्रहणाचा कायदा पुर्ववत करा तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार जमा करा शेतकरी तुम्हाला दुवा देईल, याची तुम्हाला भविष्यात फार गरज आहे.
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला चांगलाच टोला हाणला आहे. त्यांनी अन्य एका पोस्टमधूनही महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी सर्वाधिक राष्ट्रवादीला लक्ष्य केले होते. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झालेली बघून लोकशाहीवर प्रेम करणारा प्रत्येक माणसाच्या मनाला वेदना होत आहेत. अर्थात, राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या सत्तापिपासू तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
विशेष म्हणजे विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीमध्ये राजू शेट्टी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यांना पक्षांतर्गत कडाडून विरोध झाल्याने त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घेतले होते. त्यांनी सध्या एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी महाविकास आघाडीवर चांगलेच नाराज आहेत. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाडिकांच्या विजयाने वेगळी राजकीय समीकरणे आकाराला येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाडिक-कोरे-आवाडे आणि शेट्टी अशी आघाडी आकाराला येईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.