Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बंदी आदेश; 'या' तारखेपासून होणार नव्या आदेशाची अंमलबजावणी
1 मे 2023 रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते 13 मे रात्री 12 पर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी जिल्ह्यामध्ये बंदी आदेश (Prohibition order in Kolhapur District) जारी केले आहेत.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) एक दिवसाच्या अंतराने पुन्हा बंदी आदेश (Prohibition order in Kolhapur District) लागू होणार आहे. यापूर्वी लागू केलेला आदेश 29 एप्रिलपर्यंत लागू असतानाच दुसरा आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार आता 1 मे 2023 रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते 13 मे रात्री 12 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणुका काढणे व सभा घेण्यास बंदी असेल.
कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून शाहुवाडी, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर, भुदरगड, वडगाव, हातकणंगले आणि शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडल्या आहेत. यामधील काही घटनांमध्ये परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली असल्याने भा.द.सं. कलम 363 नुसार दाखल गुन्ह्यात तसेच मिसिंग सारख्या घटनांमध्ये देखील अचानकपणे जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस मे महिन्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण होवून जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश लागू करण्यात आला आहे.
खालील कृतींना बंदी असेल
या आदेशान्वये, शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेत्रणात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, प्रतीकात्मक प्रदर्शन, जाहीर घोषणाबाजी, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे, सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे याला बंदी असेल.
कोणाला आदेश लागू असणार नाही
दरम्यान, सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासाठी वर नमूद केलेल्या वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा, इ. शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना हा आदेश लागू असणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
