(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Panchganga River Pollution : पंचगंगा नदी प्रदूषण, आम आदमी पार्टीचे इचलकरंजीत अर्धनग्न आंदोलन; केंदाळ गळ्यात घालून केला निषेध
मनपा प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा निषेध म्हणून आम आदमी पक्षाकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पंचगंगा नदीत उतरून केंदाळ गळ्यात घातले.
Panchganga River Pollution : पंचगंगा नदी ही विषगंगा होत चालल्याने आज इचलकरंजीमध्ये आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. इचलकरंजी शहरवासियांची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी प्रदूषणच्या विळख्यात अडकली आहे. पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. तसेच नदीतील जलचरांना धोका निर्माण झाला असून दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महानगरपालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा निषेध म्हणून आम आदमी पक्षाकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पंचगंगा नदीत उतरून केंदाळ गळ्यात घालून लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निषेध केला. दरम्यान, महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे बाजीराव कांबळे, अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. येत्या 1 महिन्यात पंचगंगा नदीतून पूर्णपणे केंदाळ काढून नदी स्वच्छ व प्रदूषण मुक्त करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी एकत्रितपणे साटे लोटे : अभिषेक पाटील
इचलकरंजी शहरवासियांना 24 तास मुबलक पिण्याचे पाणी देणार म्हणून घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पाणी प्रश्नावर राजकारण करून शहरवासियांच्या भावनांशी खेळू नये. केवळ राजकीय स्वार्थापोटी पाणी प्रश्न उकरून काढण्याऐवजी ठोस उपाययोजना करून इचलकरंजीच्या नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे एकत्रितपणे साटे लोटे असल्याचा आरोप आपचे जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केला.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, शहराध्यक्ष प्रकाश सुतार, शहर उपाध्यक्ष लक्ष्मण पारसे, सचिव वसंत कोरवी, खजिनदार रावसो पाटील, युवा सचिव अरिहंत उपाध्ये, युवा संघटक नारायण पारसे, दिपक चांदणे, अब्दुल बसताडे, सिदप्पा भंगारे, अल्लाउद्दीन राजाणावर, शरद लोंढे, शिवराम गेजगे, शमसूद्दीन मकानदार, ओंकार गेजगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आराखडा बनवण्याचे काम सुरू
दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही महापालिकांना पंचगंगा नदीतील प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि इतर उपाययोजनांसाठी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश दिले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. हा आराखडा तीन पातळ्यांवर होणार आहे. नदीकाठी असणाऱ्या औद्योगिक वसाहती, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका हे स्वतंत्रपणे आराखडा बनवणार आहेत. औद्योगिक वसाहतींचे सर्वेक्षण सुरू असून, महापालिकांनीही आराखडा बनवण्याचे काम सुरू करावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या