Deepak Kesarkar : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटींचा निधी मंजूर; पालकमंत्री दीपक केसरकरांची माहिती
कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 70 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Kolhapur News : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 70 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने दररोज अपघाताला निमंत्रण मिळत आहे. करण्यात आलेल्या पॅचवर्कचा दर्जाही अत्यंत सुमार आहे. त्यामुळे मंजूर निधीतून किमान दर्जाचे मुख्य रस्ते दुरुस्त होतील, अशी आशा आहे.
दरम्यान, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नगरोत्थान योजनेचा आढावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून मुंबईहून घेतला. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. बलकवडे यांनी नगरोत्थान मधून अधिक निधी मिळण्याची मागणी केली. इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कोल्हापूर शहराप्रमाणे इचलकरंजी शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी 15 कोटींचा निधी तसेच इचलकरंजी नवीन महानगरपालिका असल्याने शासनाकडून मिळणारे शंभर कोटीचे पॅकेज व जीएसटीचे अनुदान मिळण्याची मागणी केली.
कोल्हापूर मनपासह इचलकरंजी मनपाला निधी मंजूर
नगरोत्थान अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला दहा कोटी, इचलकरंजी महानगरपालिका नऊ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक नगरपालिकेला लोकसंख्येप्रमाणे निधीचे वाटप करण्यात येऊन सदरचा निधी प्रस्तावित केलेल्या कामासाठी नियोजन विभागाने वितरित करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री केसरकर यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीतील सर्व शासकीय यंत्रणेचा निधी खर्च बाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेऊन जे विभाग 31 मार्च 2023 अखेर पर्यंत निधी खर्च करु शकणार नाहीत, त्या विभागाचा निधी तत्काळ समर्पित करुन घ्यावा, अशा सूचनाही केसरकर यांनी दिल्या आहेत.
शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी
पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, "कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळावा याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आलेली होती. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री महोदय यांनी 70 कोटीचा निधी मंजूर केला आहे. हा निधी त्वरित उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने नगर विकास विभाग व पालकमंत्री कार्यालयाशी नियमित संपर्क ठेवावा. या निधीतून कोल्हापूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी व आवश्यक ठिकाणी नवीन रस्ते करावेत".
जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपालिकांनी नगरोत्थान अभियानाअंतर्गत मंजूर करण्यात येत असलेल्या निधीतून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात. तसेच शहरात पाणीपुरवठा सुरळीत ठेवून स्वच्छता मोहीम काटेकोरपणे राबवावी. प्रत्येक शहरात चांगली शौचालये निर्माण करावीत. ती दिवसातून किमान तीन ते चार वेळेस स्वच्छ करण्याबाबतची यंत्रणा कार्यान्वित करावी. घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. अग्निशामन दल अद्यावत करावेत, त्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री त्वरित खरेदी करावी. या निधीतून आपल्या शहरात चांगले बदल घडवून आणावेत, अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी केल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या