पाण्याचे बॉक्स, सफरचंद, बिस्किट ते शिजवून खाण्यासाठी तांदूळ, पीठापर्यत; मुंबईमधील मराठा आंदोलकांना कोल्हापुरातून रसद
कोल्हापुरातून पिण्याच्या पाण्याचे बॉक्स,सफरचंद, बिस्किट, लाडू, फरसाण आणि भाकरी पाठवण्यात आले. शिजवून खाण्यासाठी तांदूळ आणि पीठ देखील पाठवण्यात आले.

Kolhapur News: मुंबईमध्ये आरक्षणासाठी दाखल झालेल्या मराठा बांधवांना संपूर्ण महाराष्ट्रातून रसद पोहोचवली जात आहे. कोल्हापूरातूनही मराठा बांधवांना खाण्याच्या वस्तू पाठवण्यात आल्या. आंदोलनाच्या सुरुवातीला मुंबईत मराठा समाजाची कोंडी करण्यासाठी आझाद मैदान परिसरातील खाण्याची दुकाने बंद करण्यात आली होती. पाण्याची सुद्धा वाणवा झाली होती. त्यानंतर मुंबई मनपा प्रशासनासह राज्य सरकारविरोधात एकच आक्रोश झाला. त्यामुळे मराठा बांधवांच्या खाण्याची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली होती.
मराठा बांधवाला खाण्याची वस्तू कमी पडू देणार नाही
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत न गेलेल्या मराठा समाजाकडून आंदोलकांसाठी खाण्याच्या वस्तू पोहोचवल्या जात आहेत. कोल्हापुरातून पिण्याच्या पाण्याचे बॉक्स,सफरचंद, बिस्किट, लाडू, फरसाण आणि भाकरी पाठवण्यात आले. शिजवून खाण्यासाठी तांदूळ आणि पीठ देखील पाठवण्यात आले. आरक्षण मिळेपर्यंत मराठा बांधव मुंबईतच थांबणार आहेत तोपर्यंत एकाही मराठा बांधवाला खाण्याची वस्तू कमी पडू देणार नाही असा निर्धार करण्यात आला.
शेतातील सात टन पेरू भरून ट्रक आझाद मैदानावर
दुसरीकडे, मुंबईत मराठा बांधव हजाराच्या संख्येने आझाद मैदान परिसरात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्थाही केली जात आहे. अहिल्या नगरमधील मराठा बांधवांनी आपल्या शेतातील सात टन पेरू भरून ट्रक आझाद मैदानावर आणला आहे. सकाळपासून त्याचं वाटप वेगवेगळ्या ठिकाणी ते करत आहेत. महाराष्ट्रामधून प्रचंड मोठ्या संख्येने मदत येण्यास सुरवात झाली आहे. भाकरी, चपात्यांबरोबर, तांदूळ,गहू,पाणी,बिस्किट,मसाले,लोणचं आदी साहित्य येण्यास सुरवात झाली.
आलेल्या मदतीचे लागले ढीग
प्रत्येक जिल्ह्यातील खेडेगावातून शेतकरी बांधव मदत पाठवत आहेत. आंदोलनाचे दिवस वाढू लागल्याने उपासमार होवू नये म्हणून मतदतीचा ओघ सुरू आहे. मोठ्या संख्येनं टेम्पो, ट्रक आझाद मैदानाच्या दिशेने येत आहेत. त्यामध्ये पुढील आठवडाभर हजारो मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय होईल अशा प्रकारचे नियोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधील ग्रामीण भागातून दहा हजार लोकांसाठी पुरी ठेचा चटणी लोणचं चिवडा ठेवून एक मोठा टेम्पो आझाद मैदानात आला आहे. सरकारसोबत आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप देखील कोणताही मार्ग निघाला नाही त्यामुळे आंदोलनांचा टप्पा हा तीव्र होताना दिसून येतोय या अनुषंगाने खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























