(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Loksabha Election 2024 : काँग्रेसकडूनही लोकसभेसाठी हालचाली सुरु; सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाणांना मोठी जबाबदारी
कोल्हापूरची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. हातकणंगलेची जबाबदारी अभय छाजेड यांच्याकडे, तर सांगलीची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 539 लोकसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशासह राज्यातील 48 जागांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूरची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. हातकणंगलेची जबाबदारी अभय छाजेड यांच्याकडे देण्यात आली आहे. सांगलीची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. साताराची जबाबदारी रविंद्र धंगेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
जागावाटपासाठी अभिप्राय देणार
जबाबदारी देण्यात आलेले समन्वयक आपापल्या लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे आकलन करतील आणि इंडिया आघाडीतील जागा वाटप चर्चेसाठी पक्ष नेतृत्वाला अभिप्राय देतील. समन्वयक नियुक्तीची ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा प्रमुख विरोधी पक्षाने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी X वर एका पोस्टमध्ये सांगितले की, काँग्रेस पक्षाने देशातील 539 संसदीय मतदारसंघांसाठी संयोजकांची यादी जाहीर केली असून उर्वरित चार मतदारसंघांची यादी लवकरच येणार आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आम्ही तयार आहोत! भारत बदलेल. भारत जिंकेल!”
इंडिया आघाडीसोबत जागा समन्वय
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, पक्ष किती जागा लढवायचा हे ठरवेल, परंतु पक्षाने सर्व 5000 हून अधिक मतदारसंघात निरीक्षक निश्चित केले आहेत.
लोकसभेच्या 539 जागांसाठी समन्वयकांची नियुक्ती
जयराम रमेश म्हणाले की, “आज आम्ही विचार करत आहोत की आम्हाला ए सीट मिळेल, पण समजा आमच्या इंडिया आघाडीच्या सहभागी पक्षांनी C जागा घ्यावी सांगितल्यास तयारीचा भाग म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघात समन्वयक तैनात करत आहोत.'' देशातील 539 मतदारसंघांच्या निमंत्रकांच्या यादीसोबतच, काँग्रेस अध्यक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी संसदीय मतदारसंघनिहाय समन्वयकांची नियुक्ती केल्याचे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे. याला तत्काळ प्रभावाने मंजुरी देण्यात आली आहे.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आणि दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासोबत जागावाटपाबाबत औपचारिक चर्चा सोमवारपासून (8 जानेवारी) सुरू होणार आहे. काही पक्षांशी वाटाघाटी सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं.
जागावाटपाबाबत टीम तयार
जागावाटपाबाबत काँग्रेसच्या पाच सदस्यीय समितीने याआधीच राज्य काँग्रेस प्रमुखांशी सल्लामसलत केली आहे आणि त्याचे निष्कर्ष पक्षप्रमुख खरगे यांना सादर केले आहेत. या समितीचे निमंत्रक मुकुल वासनिक असून ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल सदस्य आहेत. दरम्यान, काँग्रेसने आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीची राज्य निवडणूक समितीही स्थापन केली असून तिचे अध्यक्ष भूपेन बोरा आणि उपाध्यक्ष देबब्रत सैकिया यांना करण्यात आले आहे. या समितीमध्ये एकूण 38 सदस्य असून त्यापैकी चार अतिरिक्त पदसिद्ध सदस्य आहेत. काँग्रेसने त्रिपुरा प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सहा उपाध्यक्ष, सात सरचिटणीस आणि 19 सचिवांची नियुक्ती केली. पक्षाने आशिष साहा यांच्या नेतृत्वाखालील त्रिपुरा युनिटमध्ये कोषाध्यक्ष आणि 41 कार्यकारी सदस्यांची नियुक्ती केली.
इतर महत्वाच्या बातम्या