Kolhapur News : धबधबा पाहताना युवक वाहून गेला; वाहून गेल्याचे कोणाच्याच लक्षात नाही आलं नाही अन् मित्रांची उडाली भंबेरी
सर्व मित्र धबधब्यात आनंद लुटत असताना प्रणव नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर मित्रांची भंबेरी उडाली. सर्वांसोबत आनंद लुटताना प्रणव पाण्याच्या प्रवाहाबरोबर कधी वाहून गेला, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kollhapur News) राधानगरी तालुक्यालील तोरस्करवाडीत (ता. राधानगरी) धबधबा पाहण्यासाठी मित्रांसमवेत गेलेला युवक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. प्रणव भिकाजी कलकुटकी (वय 19, रा. शिवाजीनगर, गारगोटी, ता. भुदरगड) असे त्याचे नाव असून शोधकार्य सुरू करण्यात आलं असलं, तरी तो अजून सापडलेला नाही. आपत्कालीन यंत्रणेकडून त्याचा शोध घेत असतानाच मुसळधार पाऊस व पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शोधकार्यात अडचणी आल्या. अखेर अंधार पडल्याने शोधकार्य थांबवले. यामुळे तो बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.
सर्व मित्र धबधब्यात आनंद लुटत असताना प्रणव नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर मित्रांची एकच भंबेरी उडाली. सर्वांसोबत आनंद लुटताना प्रणव पाण्याच्या प्रवाहाबरोबर कधी वाहून गेला, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही.
धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने दुर्घटना
गारगोटी भागातील काही युवक आडोलीपैकी तोरस्करवाडी धबधबा पाहाण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत प्रणव सुद्धा गेला होता. भुदरगड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह मोठा आहे. मित्र मिळून धबधब्यातील पाण्याचा आनंद लुटत असतानाच प्रणव अचानक गायब झाला. यानंतर मित्रांनी शोध घेण्यास सुरुवात केली, पण सापडला नाही. भेदरलेल्या मित्रांनी तोरस्करवाडी ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला. यानंतर राधानगरी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
आपत्कालीन यंत्रणेला पाचारण करून शोधमोहिम
पोलिसांनी आपत्कालीन यंत्रणेला पाचारण करून प्रणवचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर प्रणवचे नातेवाईकही तोरस्करवाडीत पोहोचले. मात्र, पाऊस असल्याने शोध कार्यात अडथळा आला.
मिरवणुकीतून परतल्यानंतर तरुणाचा अचानक मृत्यू
दरम्यान, चार दिवसांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीतून घरी परतल्यानंतर तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना गडहिंग्लज तालुक्यात घडली. अभिजित महादेव सावंत (वय 32) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अभिजितच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. तो एकुलता एक होता. मिरवणूक पार पडल्यानंतर घरी जेवण झाल्यानंतर अभिजितच्या डोक्यात अचानक कळा सुरू झाल्या. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केल्यानंतर मेंदूतील रक्तस्रावाचे निदान झाले. त्याला उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या