Rajarshi Shahu Maharaj : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे म्हटले आहे. वेदोक्त प्रकरणातून समतेचा पाया रचणारे लोकराजा, करवीर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आयुष्याला क्रांतीकारक वळण देणारी घटना आहे. त्यामुळे त्यांचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांच्या पत्नीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध केल्याने हा मुद्दा  पुन्हा एकदा  समोर आला आहे. मात्र, वेदोक्तच्या (Vedokta) ठिणगीने महाराजांनी दीर्घकाळ लढा देत सामाजिक न्यायाची लढाई जिंकली होती. 


संयोगीताराजे यांच्या बाबतीत काय प्रसंग घडला?


संयोगीराजे यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की,नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पुजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. 


आता वेदोक्त प्रकरणाकडे वळूया 


इतिहासकार डाॅ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" या पुस्तकामध्ये वेदोक्त प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं आहे. करवीर संस्थानात छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा या देशाला दिशा देणाऱ्या ठरल्या. विलायतेत त्यांनी जे जे पाहिलं त्याच पद्धतीने करवीर संस्थानात त्यांनी नवनिर्मितीचे स्वप्न पाहिले. याच त्यांच्या विधायक आणि काळाच्या कैक पटीने पुढे जाऊन विचार करण्याच्या क्षमतेमुळे आज कोल्हापूर जिल्हा सधन आणि पुरोगामी विचाराचा वारसा देणाऱ्यांची भूमी आहे. याच भूमीमध्ये लोकराजा शाहुरायांना शुद्र म्हणण्याची विकृती कर्मठ ब्राह्मणवर्गाने त्या काळी केली होती. त्याला पार्श्वभूमीच अर्थातच वेदोक्त प्रकरणाची होती. मात्र, महाराजांनी हा सामाजिक लढा न्यायालयीन पातळीवर लढून कर्मठ ब्राह्मणांना त्यांची जागा दाखवून दिली होती.


वेदोक्त प्रकरणाची ठिणगी कशी पडली?


शाहू महाराज राजघराण्यातील धार्मिक परंपरेने कार्तिक महिन्यात पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी महिनाभर नियमितपणे जात असत. महाराजांच्या अंघोळ सुरू केल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेला नारायण नावाचा भटजी ब्राह्मण पुरोहित काही मंत्र म्हणत असे. या भटजीसाठी त्याच्या घरापासून ने-आण करण्यासाठी घोडागाडीची व्यवस्था केली होती. त्याला भरपूर दक्षिणाही देत होते. मात्र हा भटजी स्वतः आंघोळ न करताच मंत्र म्हणत होता. मंत्र म्हणताना पायातल्या चपला सुद्धा काढत नव्हता.  जो मंत्र म्हणत होता तो काही वेदोक्त नव्हता तर पुराणोक्त होता.


विद्वान ब्राह्मणाने महाराजांना चूक लक्षात आणून दिला 


त्या भटजीमध्ये महाराजांना या असल्या कुठल्याही गोष्टींमध्ये काहीही स्वारस्य नव्हते. त्याची कृती ही धर्माला अनुसरुन असेल, इतकीच त्यांची धारणा होती. मात्र, त्या भटजीची पोलखोल महाराजांचे मित्र असलेल्या एका विद्वान ब्राह्मण मित्राने केली. राजाराम शास्त्री असे त्यांचे नाव होते. ते महाराजांच्या भेटीसाठी कोल्हापूरला आले होते. ते एक दिवस असेच महाराजांसोबत स्नानाला नदीकाठावर गेले. त्यावेळी महाराजांचे स्नान सुरू झाल्यानंतर भटजी नेहमीप्रमाणे मंत्र म्हणू लागला. तेव्हा त्याचा धूर्तपण राजाराम शास्त्री यांनी ओळखला व महराजांच्या कानात जाऊन सांगितला. 


राजारामशास्त्री म्हणाले की, महाराज आपण क्षत्रिय आणि राजा असल्याने आपणास वेदोक्त मंत्रांचे अधिकार आहेत. असे असतानाही हा भटजी पारोशानेच पुराणोक्त मंत्र म्हणतो आहे. तेव्हा शाहूराजांनी नारायण भटजीला विचारले की भटजीबुवा तुम्ही आंघोळ केली की नाही? त्यावेळी तो म्हणाला की, नाही वेदोक्त मंत्र म्हणताना अंघोळीची आवश्यकता असते. पुराणोक्त मंत्रासाठी नाही. शाहू महाराजांनी पुढे विचारले की,  म्हणजे तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणत नाही? त्यावर तो म्हणाला की नाही. त्यावेळी महाराजांनी पुन्हा विचारले का? त्यावर तो म्हणाला की शुद्रांसाठी पुराणोक्तच सांगावं लागतं. 


शिवछत्रपतींच्या वंशजाला शुद्र म्हणून एक सामान्य भटजी संबोधत असल्याने महाराजांच्या मस्तकात आग पेटली होती. राजाला ही वागणूक देत असतील, तर हे कर्मठ सामान्य बहुजनांना काय वागणूक देत असतील? या विचारानेच ते  पेटून उठले. कर्मठ ब्राह्मण वर्गाच्या दृष्टीने जगात फक्त ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ग शिल्लक असून क्षत्रिय नामशेष झालेले आहेत. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली असे ते म्हणत असत. पण त्याच परशुरामाचा पराभव क्षत्रिय रामाने केला होता हे ते सोयीस्करपणे विसरत होते. त्यामुळे वर्णभेद आणि विषमतेचे शाहू राजे बळी ठरले होते. 


नारायण भटजीची हकालपट्टी 


महाराजांनी त्या नारायण भटजीची तातडीने हाकालपट्टी करत राजवाड्यातील राजपुरोहितांना सुद्धा सर्व धार्मिक विधी वेदोक्त मंत्रांनी करावीत असे सुनावले. यानंतर राजपुरोहित सुद्धा पूजाअर्चा करण्यास येत  नव्हता. त्यामुळे महाराजांनी राजपुरोहिताचे सर्व हक्क काढून घेत त्याचे 30 हजाराचे इनामी उत्पन्नही जप्त करून टाकले. 


फक्त कोल्हापूर नव्हे देशात या प्रकरणाची चर्चा 


यानंतर हे वेदोक्त प्रकरण प्रकरण फक्त करवीर संस्थानापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रभर पोहोचले. लोकमान्य टिळकांनी सुद्धा यामध्ये राजकारण आणत यांनी रुढीवादी ब्राह्मण वर्गाची बाजू घेतली होती. त्यामुळे त्यांनी समस्त मराठा आणि इतर जातीच्या लोकांच्या अस्मितेचा भंग केला होता. त्यामुळे शाहू महाराजांनी केवळ आपल्या घराण्यापुरता वेदोक्ताचा अधिकार न मागता तो समस्त मराठ्यांना मिळाला पाहिजे, म्हणून भूमिका मांडत सामाजिक न्यायाची भूमिका मांडली आणि आपला संघर्ष चालूच ठेवला. 


राजोपाध्यांचे इनाम शाहू महाराजांनी जप्त केल्याने हे प्रकरण प्रथम मुंबईच्या गव्हर्नरकडे गेले होते. त्यानंतर शेवटी हिंदुस्तानच्या व्हॉइसराईकडे गेले. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणात व्हॉइसरायने राजोपाध्यांची केस फेटाळून लावली व वेदोक्ताची लढाई शाहू राजांनी जिंकली. सामाजिक विषमता गाढून टाकण्यासाठी करवीरनगरीच्या धुरंदर राजाने बहुजनांसाठी दिलेला लढा समतेची पेरणी करणारा होता. 



  • संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती महाराज  लेखक -  डाॅ. जयसिंगराव पवार 


इतर महत्वाच्या बातम्या