Panchganga River Pollution : कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही महापालिकांना पंचगंगा नदीतील प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि इतर उपाययोजनांसाठी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश दिले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. हा आराखडा तीन पातळ्यांवर होणार आहे. नदीकाठी असणाऱ्या औद्योगिक वसाहती, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका हे स्वतंत्रपणे आराखडा बनवणार आहेत. औद्योगिक वसाहतींचे सर्वेक्षण सुरू असून, महापालिकांनीही आराखडा बनवण्याचे काम सुरू करावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.


पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मासेही मृत्यूमुखी पडत आहेत. नदीपासून काही अंतरावर असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधील औद्योगिक सांडपाणी नदीमध्ये मिसळते. इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील सांडपाणीही ओढ्यांमधून नदीत जाते. कोल्हापूर महापालिकेने प्रक्रिया प्रकल्प सुरू केले आहेत पण अद्याप सहा नाले थेट नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे. या शिवाय नदी काठी असणाऱ्या 32 गावांमधील सांडपाणी थेट नदीत जाते. या सगळ्याची गंभीर दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणमुक्त नदीसाठी आराखडा बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यातील याअंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांनी तात्काळ आराखडा बनवण्याचे काम सुरू करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


कोल्हापूर शहराला लवकरच काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी मिळणार असून, त्यानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने एसटीपीचा प्रस्ताव पाठवला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. शहरासाठी सुळकुड पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर इचलकरंजी येथेही अशीच परिस्थिती निर्माण होईल. रेखावार म्हणाले, प्रस्ताव स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांत टेंडरिंग आणि वर्कऑर्डरच्या परवानग्या द्याव्यात. ते पुढे म्हणाले की, इचलकरंजी, आसपासच्या औद्योगिक भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आल्या आहेत.


पंचगंगेच्या पात्रात माशांचा तडफडून मृत्यू


दरम्यान, जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यात कोल्हापूर शहरापासून ते पार शिरोळपर्यंत मृत माशांचा खच पडला होता. पोकळ आश्वासने, प्रदुषणमुक्तीची गुलाबी स्वप्ने, कारखान्यांकडून सांडपाणी थेट पाण्यात सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यात अक्षरश: विष तयार होत आहे. पाण्यातील ऑक्सिजनचा अंश कमी होत चालल्याने लाखो मासे तडफडून मृत्यूमुखी पडत आहेत. तेरवाड बंधाऱ्याजवळ लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या