कोल्हापुरातील प्रमुख रस्त्याला भाऊसिंगजी रोड नाव कसे पडले?


कोल्हापुरात भाऊसिंगजी रोड समस्त पर्यटकांनी आणि कोल्हापूरकरांनी आणि शासकीय कामासाठी कोल्हापुरात येणाऱ्या लोकांनी गजबजून गेलेला असतो. त्यामुळे या रोडला हे नाव कसं पडलं हे थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल. लोकराजा शाहू महाराज दत्तकविधी पार पडल्यानंतर करवीचे छत्रपती झाले. वयाच्या दहाव्या वर्षी ते छत्रपती झाले. त्यामुळे हा त्यांचा कालखंड शालेय शिक्षणाचा होता. 


महाराजांच्या वडिलांनी राजकोट निवडले


शाहू महाराज आणि त्यांचे बंधू पिराजीराव यांच्या शिक्षणासाठी त्यांचे वडिल आबासाहेब घाटगे यांनी इंग्लंडचा दौरा केला होता. त्यांनी तेथील शाळा काॅलेज पाहिल्यानंतर मुलांना देशातच शिकवण्याचा अंतिम निर्णय घेतला होता. राजघराण्यातील सर्वांशी आणि इंग्रज अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी महाराजांना शिक्षणासाठी राजकोटमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. शिवछत्रपतींच्या गादीचा मान राखणाराच शाहूराजा घडला पाहिजे, याकडे वडिलांचा कटाक्ष होता. 


या सर्व पार्श्वभूमीवर शाहू छत्रपतींना राजकोटमधील राजकुमार काॅलेजमध्ये पाठवण्याचा निर्णय झाला. त्यांच्यासोबत देखरेख ठेवण्यासाठी ब्रिटीश अधिकारी फिटझिराल्ड यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्यासोबत बंधू बापूसाहेब, चुलतबंधू काकासाहेब, तसेच दत्ताजी इंगळे हे सुद्धा जाणार होते. तसेच आबासाहेबांचे विश्वासू सरदार बुवासाहेब इंगळे, कृष्णाजी गोखले आणि हरिपंत गोखले या दोन शिक्षकांसह या तिघांवर जबाबदारी देण्यात आली. सोबत दोन मल्लही त्यांना कुस्ती जोपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. 


राजकुमार काॅलेजात झाली भाऊसिंहजी यांची ओळख 


शाहू महाराजांच्या वडिलांनी राजकोटला शिक्षणासाठी पोहोचवण्यासाठी सोय केल्यानंतर त्यांनी राजकुमार काॅलेजमध्ये  प्रवेश घेतला. आणि अभ्यासक्रम शिकण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी त्यांना अनेक बालमित्र लाभले. त्याचवेळी भावनगरचे भाऊसिंगजी महाराजही याच ठिकाणी शिकत होते. या दोघांची याच ठिकाची जिगरी दोस्ती झाली. ही मैत्री इतकी झाली की ते शाहू महाराज परतून कोल्हापुरात आल्यानंतरही ती कायम राहिली. 


करवीर संस्थानात परतल्यानंतर त्यांनी राज्य कारभार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी आपल्या मैत्रीची आठवण म्हणून कोल्हापुरातील प्रमुख राजरस्त्याला भाऊसिंगजी महाराजांचे नाव दिले. तेच नाव आजतागायत कोल्हापुरात शेकडोवेळा तोंडात येते. यावरून महाराजांची भाऊसिंगजी यांच्याशी असलेल्या मैत्रीचा अंदाज येतो. महाराजांनी राजकोटमध्ये शिकत असतानाच कुस्ती, घोडेस्वारी या खेळात प्राविण्य मिळवले होते. शिक्षण करून परत येत असतानाच  शाहू महाराजांचे वडिल आबासाहेब यांचे निधन झाले. दोन दिवसांनी ते कोल्हापुरात पोहोचले. शाहूराजे त्यावेळी केवळ 12 वर्षांचे होते. त्यामुळे अल्पवयामध्ये शाहूराजे आणइ बापूसाहेब पोरके झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या