Kolhapur News: तर विशेष बाब म्हणून कोल्हापुरात मेट्रो सुरू होऊ शकते! कोकण रेल्वेच्या माजी प्रकल्प संचालकांनी सांगितला सोपा उपाय
कोकण रेल्वेचे माजी प्रकल्प संचालक व मुख्य अभियंता दीपक दिवटे यांनी कोल्हापूर-वैभववाडी या 107 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचा प्रस्तावित आराखडा कोल्हापूर इंजिनिअर्स आयोजित चर्चासत्रात मांडला.
Kolhapur News : कोकण रेल्वेचे (konkan railway) माजी प्रकल्प संचालक व मुख्य अभियंता दीपक दिवटे यांनी कोल्हापूर-वैभववाडी (Kolhapur to Vaibhavwadi) या 107 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचा प्रस्तावित आराखडा कोल्हापूर इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे आयोजित चर्चासत्रात मांडला. या कार्यक्रमाला खासदार संजय मंडलिक आणि मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी उपस्थित होते. प्रस्तावानुसार, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी अंदाजे अंदाजपत्रक सुमारे 4,000 कोटी असेल आणि त्यासाठी 683 हेक्टर भूसंपादन आवश्यक असेल.
दीपक दिवटे म्हणाले की, “वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे हा कोकण रेल्वेचा भाग आहे आणि त्याचा भूभाग कोकणासारखाच असेल. हा रेल्वे मार्ग झाल्यास जयगड बंदर आणि गोवा बंदरात सहज जाता येईल. बहुतांश कोकण आजही त्यांची बाजारपेठ, भाजीपाला, फळे, वैद्यकीय आणि शैक्षणिक गरजांसाठी कोल्हापूरवर अवलंबून आहे.
तर विशेष बाब म्हणून कोल्हापुरात मेट्रो सुरू होऊ शकते
ते पुढे म्हणाले की, 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात मेट्रो सुरू होते, असा नियम आहे. मात्र, कोल्हापूरची लोकसंख्या तेवढी नसल्याने मेट्रो सुरू होऊ शकणार नाही. मात्र. कोल्हापूरकरांनी मनावर घेतल्यास विशेष बाब म्हणून कोल्हापुरात मेट्रो सुरू (Metro in Kolhapur) होऊ शकते. त्यासाठी कोल्हापूरची हद्दवाढ होणे क्रमप्राप्त आहे.
ते पुढे म्हणाले की, संपूर्ण कोकण कोल्हापूरवर बाजारपेठेसाठी अवलंबून आहे. कोल्हापुरातील भाजीपाला, धान्य आणि गूळ निर्यात करण्यासाठी कोकण जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे कोल्हापूर-कोकणला जोडणारा कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम होणे आवश्यक आहे. प्रस्तावित मार्गाचा दोनवेळा सर्व्हे झाला आहे. काम सुरू झाल्यानंतर चार वर्षात रेल्वेमार्ग सुरू होईल. 107 किलोमीटरच्या रेल्वेमार्गात 28 किमी बोगदे निर्माण करावे लागणार आहेत, हे काम कठीण असले तरी कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यास वेळ लागणार नाही. मात्र हे काम इतर कंपनीला दिल्यास त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. खासदार संजय मंडलिक म्हणाले, कोल्हापूरचा पायाभूत विकास करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. संसदेच्या अधिवेशनामध्ये कोल्हापूर - वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम त्वरीत सुरू व्हावे, अशी मागणी आम्ही करू.
कराड-चिपळूण आणि कोल्हापूर-वैभववाडी मार्गाच्या सर्वेक्षणानुसार कराड-चिपळूण हा मार्ग व्यवहार्य नसून, कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग व्यवहार्य असल्याची नोंद आहे. कोकण रेल्वेच्या या विस्तारीकरणात महाराष्ट्र सरकारने सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगण्यात आले. सुमारे 10 वर्षांपूर्वी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, मात्र त्यावर अद्याप कोणतेही काम झालेले नाही. रेल्वे मार्ग झाल्यास हा 107 किलोमीटरचा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या