Kolhapur News : शेतकरी संघ 40 हजार सभासदांचा, नाही कोणाच्या बापाचा; हजारो सभासदांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
कोल्हापूर (Kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकरी सभासदांनी विराट मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा आणि पालकमंत्री केसरकरांचा धिक्कार केला. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
कोल्हापूर : हजारो शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या मालकीची इमारत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (Kolhapur News) तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित केल्यानंतर सभासद आक्रमक झाले आहेत. आज कोल्हापूर (Kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो सभासदांनी विराट मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा आणि पालकमंत्री दीपक केसरकरांचा धिक्कार केला. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सभासदांनी शेतकरी संघ सभासदांचा, नाही कोणाच्या बापाचा, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनीही सहभाग घेतला.
मोर्चामध्ये सामील जालेल्या सभासदांच्या हातातील फलकांनी लक्ष वेधून घेतले. सहकार मोडीत काढणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, वाचवा वाचवा, सहकार वाचवा, जिल्हाधिकारी चले जाव आदी फलक लक्ष वेधून घेत होते. मोर्चात बैलगाडी सहभागी सुद्घा होती. पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाद नेमका कशाने पेटला?
आगामी नवारात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश काढत शेतकरी संघाच्या मालकीच्या इमारतीमधील तीन मजले ताब्यात घेतली. यानंतर वादाला तोंड फुटले. यानंतर संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटल्या. शेतकरी सहकारी संघाची जागा ताब्यात घेतली नसून जिल्हाधिकाऱ्यांनी दरोडा टाकला आहे. एवढ्या तातडीने जागा का ताब्यात घेतली? असा सवालही सभासदांकडून उपस्थित करण्यात आला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही प्रचंड रोष सभासदांनी व्यक्त केला आहे. केसरकरांना जागा बळकावण्याची असल्याचा आरोप करण्यात आला. नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी होते. या गर्दीसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरून चुकीच्या पद्धतीने आणि बेकायेदशीररीत्या शेतकरी संघाची जागा ताब्यात घेतल्याचा आरोप शेतकरी संघाच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर काल शेतकरी संघात बैठक पार पडली होती.
शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचविण्याचा उद्देश देवस्थान समितीचा नाही
दुसरीकडे, प्रश्चिम महाराष्ट्र समितीकडून जागा ताब्यात घेतल्यानंतर खुलासा करण्यात आला आहे. संघाच्या इमारतीचे अधिग्रहण तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले आहे. मालकी बदलता येत नाही. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचविण्याचा उद्देश देवस्थान समितीचा नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी मार्गावरच प्रशासन सदैव मार्गक्रमण करत राहील, तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या