Kasaba Beed : कोल्हापुरातील 'या' गावात आजही पडतोय सोन्याच्या नाण्यांचा पाऊस; शेतात, छपरावर अन् रस्त्याच्या कडेला, जिकडे-तिकडे नुसता नाणी
Kolhapur Kasaba Beed Gold Coins : कोल्हापुरातील जिल्हातील कसबा बीड हे गाव म्हणजे प्राचीन काळातील राजा भोजची राजधानी. आजही त्या गावात सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतोय अशी अख्यायिका सांगितली जाते.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर राज्यासह देशाला परिचित आहे. पण याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावात सोन्याचा पाऊस पडतो यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड गावात चक्क सोन्याचा पाऊस पडतो. या गावातील अनेकांना अजूनही सोन्याची प्राचीन नाणे सापडतात. पाहुयात याच संदर्भातील एक रिपोर्ट.
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कसबा बीड हे साधारण पाच ते सहा हजार लोकवस्तीचं गाव. पण या गावातील मंदिर, इथे सापडलेले शिलालेख, इथे सापडलेले वीरगळ आणि आजतागायत सापडत असलेल्या सुवर्णमुद्रा यामुळे कसबा बीडचा प्राचीनत्व सिद्ध होते.
Kasaba Beed Gold Coins : मृग नक्षत्रामध्ये सोन्याचा पाऊस
राजाभोजची राजधानी आणि लष्करी तळ म्हणून देखील कसबा बीडकडे पाहिलं जातं. याच बीडमध्ये आज देखील सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे. पावसाळा सुरू होताच मृग नक्षत्रामध्ये हा सोन्याचा पाऊस पडतो असं गावकऱ्यांचे म्हणणं आहे.
Yadav Era Golden Coins In Kolhapur : शेतशिवारात सोन्याची नाणी
शेताशिवारात, रस्त्याच्या कडेला, घरांच्या छपरावर आदी ठिकाणी यादवकालीन सोन्याची नाणी सापडतात. बीड गावच्या नावावरून या नाण्यांना सोन्याचे बेडे म्हणून देखील ओळखले जाते. काही दिवसांपूर्वीच आक्काताई जाधव यांना सोन्याचे नाणे मिळाले. यावर कमळाची नक्षी आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी अक्षरं आहेत. याचा आकार खोलगट बशीसारखा आहे.
आक्काताई जाधव यांच्याप्रमाणेच तानाजी यादव यांना देखील सुवर्णमुद्रा आढळून आली. शेताकडे कामासाठी जात असताना तानाजी यांना सुवर्णमुद्रा सापडली. जुन्या जाणत्या नागरिकांना याबद्दल पुरेपूर माहिती आहे. महादेव बिडकर यांना देखील सुवर्णमुद्रा मिळाली. बिडकर यांना सापडलेली सुवर्णमुद्रा तूरडाळीच्या आकाराची आहे.
Kasaba Beed History : सुवर्ण मुद्रा म्हणजे आशीर्वाद असा समज
कसबा बीड या गावामध्ये अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त सुवर्ण मुद्रा मनोहर पाटलांच्या घरात सापडल्या आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये त्यांच्याकडे अकरा सुवर्ण मुद्रा सापडल्या. यापैकी काही सुवर्ण मुद्रा त्यांनी पाहुण्यांना दिल्या. पण या सुवर्ण मुद्रा म्हणजे आपल्या कुटुंबाला मिळालेला आशीर्वादच म्हणून बीडचे ग्रामस्थ याकडे पाहतात आणि आपल्या देवघरामध्ये देखील या सुवर्ण मुद्रांचे पूजन केलं जातं.
Historic Coins In Kolhapur : शास्त्रीय अभ्यास होणं गरजेचं
मात्र संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रात कसबा बीड याच ठिकाणी सुवर्णमुद्रा का सापडतात? त्याच्या पाठीमागचा नेमका इतिहास काय आहे? त्याचे शास्त्रीय कारण काय आहे? असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण कसबा बीडच्या उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेला या सुवर्णमुद्रा खूप मोठ्या प्रमाणात सापडतात.
कसबा बीड या गावात गेल्या पाच वर्षांपासून जवळपास 50 सुवर्णमुद्रा सापडल्या आहेत. याच गावामध्ये 210 विरघळ आणि मोठ्या प्रमाणात शिलालेख देखील सापडले आहेत. या गावातील घरांची रचना देखील एका स्वतंत्र राज्याच्या रचनेप्रमाणे पाहायला मिळते. मात्र या सगळ्याचे आता तांत्रिकदृष्ट्या संशोधन होणे खूप गरजेचे आहे. तरच कसबा बीड हे देशाच्या नकाशावर पर्यटनाचे एक वेगळे केंद्र बनू शकते.























