Samarjeetsinh Ghatge On Hasan Mushrif : सात वर्षांपासून चेअरमन असलेला एवढं खोटं बोलतो? समरजितसिंह घाटगेंकडून कर्जाचा आकडा सांगत हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
समरजितसिंह घाटगे आणि किरीट सोमय्या यांनी आज मुश्रीफांवर प्रश्नांची सरबत्ती केली. घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या जुन्या वक्तव्यांचा तसेच बातम्यांच्या कात्रणांचा दाखला देत पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला.

Samarjeetsinh Ghatge On Hasan Mushrif : सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा नसून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी केला आहे. कारखान्याचे नाव बदलून हसन मुश्रीफ प्रायव्हेट लिमिटेड करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून संताजी घोरपडे कारखान्याला 233 कोटींचे कर्ज देऊनही हसन मुश्रीफ खोटं का बोलले? असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. सात वर्षांपासून चेअरमन असलेला एवढा खोटा बोलतो, त्यावेळी बँकेची बदनामी होत नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. 2018 /19 मध्ये नाबार्डकडून 158 कोटी कर्ज दिलं गेलं. 2019 मध्ये नाबार्डकडून 295 कोटींपर्यंत कर्ज वाढवलं गेल्याचा दावा त्यांनी केला.
समरजितसिंह घाटगे आणि किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापुरातील (Kolhapur News) शासकीय विश्रामगृहात संयुक्त पत्रकार परिषद घेत मुश्रीफांवर प्रश्नांची सरबत्ती केली. समरजित घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या जुन्या वक्तव्यांचा तसेच बातम्यांच्या कात्रणांचा दाखला देत पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरुन हसन मुश्रीफ यांची ताबडतोब हकालपट्टी करावी, अध्यक्ष असताना आपल्या कंपन्यांना दिलेलं कर्ज लॉंग टर्म केले, त्यामुळे त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी सहकार मंत्री अतुल सावेंना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
तर मग कर्ज घेतलं नाही असं स्टेटमेंट का दिलं?
समरजित घाटगे म्हणाले की, एक व्यक्ती मी म्हणजे केडीसीसी बँक (KDCC ED Raid) अशा पद्धतीने वागत आहे. बँकेत त्यांच्यामुळे भ्रष्टाचार झाला आहे. ईडीकडून धाडी पडल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी प्रेस घेतली. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेलं नाही असं सांगितलं. कर्ज घेतलं नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी आरटीआयमधून माहिती घेतली आहे. मार्च 2022 मध्ये केडीसीसीकडून सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला 233 कोटींचे कर्ज दिलं आहे. नाबार्ड रिपोर्टमध्ये सरसेनापती कारखान्याला 228 कोटी कर्ज दिल्याचा उल्लेख आहे, तर मग कर्ज घेतलं नाही असं स्टेटमेंट का दिलं?
ते पुढे म्हणाले की, कारखाना पूर्णत: मुश्रीफ कुटुंबाची कंपनी असून ती कुटुंबाच्या हातात आहे. त्यामुळे त्याचे हसन मुश्रीफ अँड प्रायव्हेट लिमिटेड करावे. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचा समावेश नाही. कर्ज देताना नियम का पाळले नाहीत? तुमच्या कारखान्याने कर्ज घेऊन खोटं का बोलला? नियम पाळले गेले का? याची माहिती द्यावी.
मुश्रीफांनी सात दिवसात माहिती द्यावी
दरम्यान, किरीट सोमय्या म्हणाले की, कर्जदारांची टॉप 25 नावे जाहीर करण्यात यावीत, ऑडिटरची पण चौकशी सुरू आहे. केडीसीसीमधून (KDCC ED Raid) हसन मुश्रीफ यांनी नेमके किती बोगस कर्ज घेतलं आहे याची माहिती द्यावी. 7 दिवसाची मुदत देतो, आकडा तुम्ही जाहीर करा, नाहीतर आम्ही जाहीर करतो. ईडीसह सगळे विभाग देखील चौकशी करत आहेत. अनेक शेतकरी मुबंईला भेटण्यासाठी येत होते. त्यामुळे मीच कोल्हापूरला जावे असा विचार केला. शेतकरी, अधिकारी, संचालक भेटले. केडीसीसी मजबूत राहणार असून ठेवीदारांची रक्कम सुरक्षित राहणार आहे. एका व्यक्तीने घोटाळा केल्याने चौकशी लागली आहे तर ती बँकेची चौकशी नव्हे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
