Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पुराचा धोका टळला, बालिंगा पुलावरून सर्व वाहनांसाठी वाहतूक सुरू; जिल्ह्यातील अजूनही 32 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असली, तूर्तास धोका मात्र टळला आहे. प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला आहे.
Kolhapur Rain Update: गेल्या अनेक दिवसांपासून इशारा पातळीवरून वाहत असलेल्या पंचगंगा नदीने पाऊस ओसरल्याने पात्राकडे वेगाने प्रवास सुरु केला आहे. पंचगंगा नदीची पातळी आता 36 फूट 7 इंचावर आली आहे. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Rain Update) 18 बंधाऱ्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. कोल्हापूर शहरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु असली, तरी जोर कमी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असली, तूर्तास धोका मात्र टळला आहे. प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला आहे.
बालिंगा पुलावरून सर्वच वाहनांसाठी वाहतूक सुरु करण्यात आल्याने सुद्धा जिल्हावासियांसह कोकणात जाणाऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. कोणत्याही सुचनेशिवाय मार्ग अचानक बंद करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. जिल्ह्यात पावसाने सलग उघडीप दिल्याने भातश शेती मशागत आणि भुईमूग कोळपणीला गती मिळाला आहे.
कोल्हापुरात सर्वच नद्या इशारा पातळीवर पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून वेगाने पुराचे पाणी ओसरू लागल्याने आता 32 बंधारे पाण्याखाली आहेत. या मार्गांवर अजूनही पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा पुन्हा वर्षा पर्यटनासाठी सुरु करण्यात आला आहे. कोल्हापूर शहराला लागून कळंबा तलाव, तसेच कंदलगाव तलाव सुद्धा भरल्याने चिंता मिटली आहे. रंकाळा तलाव पूर्ण भरण्यास अजून पावसाची आवश्यकता आहे. दुसरीकडे दोन आठवड्यांपासून नदीकाठची पिके पाण्याखाली ऊस सोडून सोयाबीन, भात, भुईमूग पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
महापुराचा धोका टळला
धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने महापुराचा धोका टळला आहे. जिल्ह्यातील 32 बंधारे अजून पाण्याखाली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तविला आहे. दुसरीकडे पावसाचा जोर कमी होऊन पाण्याची आवक सुरुच असल्याने राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा सुरू आहे. त्यामुळे धरणातून एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी पातळी संथगतीने कमी होत आहे. राधानगरी धरणाचा दरवाजा कदाचित आज बंद होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :