कोल्हापूर : मुलगा होत नसल्याने सासरी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटालून दोन मुलींची आई असलेल्या विवाहिताने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) करवीर तालुक्यातील सडोली खालसात घडली. अस्मिता केदारी चौगले (वय 30, रा. कोथळी, ता. करवीर) असे या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पती केदारी गणपती चौगले, सासू आनंदी गणपती चौगले आणि सासरा गणपती गुंडू चौगले (तिघे रा. कोथळी, ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. 


मुलगा होत नसल्याने छळ 


मृत विवाहिता अस्मिता चौगले यांचे वडील दगडू सदाशिव यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अस्मिता आणि केदारी यांचा 13 वर्षांपूर्वी केदारी यांच्याशी विवाह झाला होता. केदारी आणि अस्मिता यांना अनुक्रमे 9 आणि 8 वर्षांच्या दोन मुली आहेत. त्यामुळे मुलगा होत नसल्याने पती, सासू आणि सासऱ्याकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून अस्मिताने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पतीने गळफास सोडवून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 


तीन महिन्यांपूर्वी लग्नाची गाठ बांधलेल्या तरुणाची आत्महत्या


दरम्यान, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्नाची गाठ बांधलेल्या तरुणाने पत्नीला माहेरी सोडून राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये दोन दिवसांपूर्वी घडली होती. रोहित शंकर मोरे (वय 26) असे त्याचे नाव आहे. रोहितच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. गवंडी काम करणाऱ्या रोहितचे 3 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वडिलांचे वडिलांचे महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. रोहितची आई त्यांच्या माहेरी गणेशोत्सवासाठी गेली होती. रोहितने पत्नीला माहेरी सोडले. त्यामुळे घरी रोहित आणि त्याची आजी असे दोघेच होते. सायंकाळी चारच्या सुमारास रोहितने राहत्या घरात दुसऱ्या माळ्यावर खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यानंतर कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दुसरीकडे आजरा तालुक्यातील माळाप्पा मारुती कुरबर (वय 21, मुळगाव रा. यादगुड, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याने गोठ्यात गळफास घेवून आत्महत्या केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या