Kolhapur News : अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये गेल्या 20 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी (Dhanagar Reservation) उपोषण सुरु आहे. राज्यभरातून धनगर आरक्षणासाठी धनगर बांधव आक्रमक झाले आहेत. चौंडीमधील उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातही (Kolhapur News) आंदोलन करण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीत एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी शेळ्यामेंढ्यांसह धनग बांधव रस्त्यावर उतरले. यावेळी धनगर बांधवांकडून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. 


धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच  


गेल्या 20 दिवसांपासून राज्य सरकारकडून धनगर आरक्षणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, त्यामध्ये यश आलेलं नाही. अहमदनगरमधील चौंडीमध्ये धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू केलं आहे. जनजातीय कार्य मंत्रालयाचा वार्षिक अहवालात धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात आहे, त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी यशवंत सेनेकडून उपोषण सुरु आहे. आंदोलनाचा कालावधी वाढत गेल्याने आता धनगर बांधव रस्त्यावर उतरले आहेत. राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे, इतर राज्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील सुविधा दिल्या जातात, मग महाराष्ट्र राज्यात का नाही? अशी भूमिका यशवंत सेनेनं घेतली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. 


धनगर आरक्षणासाठी समाजाच्या रेट्याची गरज


दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि धनगर समाजालाही आरक्षण हवं असेल तर समाजाचा रेटा तयार व्हायला हवा, त्यासाठी तेवढे आमदार-खासदार असणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. 


आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही; नरहरी झिरवाळांचा इशारा


धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात (ST) समावेश करण्याची मागणी धनगर संघटनांकडून केली जात आहे. मात्र, आदिवासी समाज संघटनाकडून विरोध सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्त्वात आदिवासी संघटनांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी झिरवाळ बोलत होते. 'आम्ही आदिवासी जातीचे आहोत, म्हणून आम्हाला पदांची संधी मिळाली. पद असेल किंवा नसेल आदिवासी समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. शासनाने धनगर समाजाला आरक्षण जरूर द्यावे, त्याला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, आदिवासींचे आरक्षण कमी करून धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे, असे स्पष्ट मत आमदार नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या