इचलकरंजी (कोल्हापूर) : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Crime) मारामारीच्या सलग घटना सुरुच असून आता मंगळागौर खेळताना मोठ्याचे हसल्याचे कारण झाल्याने दोन कुटुंबामध्ये तुफानी राडा झाला. इचलकरंजीमधील कबनूरमध्ये दोन कुटुंबामध्ये झालेल्या या वादात दगड, वीटा, चाकू घेऊन मारहाण झाली. या तुफानी राड्यात मारहाणीत कृष्णात शिवाजी जाधव, ललिता जाधव, सुलोचना शहाजी घाटगे, आकाश शहाजी घाटगे, आकांक्षा घाटगे जखमी झाले आहेत.  


रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांसह पाच जणांवर गुन्हा 


दोन कुटुंबातील तुफानी राड्यानंतर रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांसह पाच जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कुटुंबाकडून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कबनूरमध्ये तिरंगा युवक कला क्रीडा मंडळ येथे महिला मंगळागौर खेळत होत्या. यावेळी कृष्णात जाधव, मुलगा अक्षय आणि त्याच्या मित्राने मोठ्याने हसल्याचा जाब आकाश घाटगे व मुकेश घाटगे यांनी विचारला. यानंतर आकाशने जाधव यांची गळपट धरून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जाधव यांची पत्नी ललिता जाधव यांना उजव्या हातावर दगडाने मारून जखमी केले. मुकेशने दोघांना मारहाण व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीचा जाब विचारत कृष्णात जाधव यांनी सुलोचना घाटगे यांच्या घरी जावून विटेने मारहाण करून जखमी केले. तसेच आकाशला अक्षयने चाकूने मारत जखमी केले. मुद्दसर घुणके यानं आकांक्षा घाटगे व सुलोचना घाटगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 


याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला. कृष्णात जाधव यांच्या फिर्यादीनुसार आकाश घाटगे, मुकेश घाटगे यांच्यावर तर सुलोचना घाटगे यांच्या फिर्यादीनुसार कृष्णात जाधव, अक्षय जाधव, मुदस्सर घुणके या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 


बोंद्रेनगरात तलवार हल्ला, बावड्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला


दुसरीकडे, कोल्हापूर शहरात (Kolhapur Crime) गणेशोत्सव सुरु झाल्यापासून तलवार आणि कोयत्याचा नंगानाच सुरुच आहे. कसबा बावड्यात पाठलाग करून कोयता हल्ला ताजा असताना बोंद्रेनगरात तलवार हल्ला केल्याची घटना घडली होती. बावड्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करून दहशत माजवण्यात आली. यावेळी दुचाकींचे नुकसान करून शेजाऱ्यालाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे गौरी गणपतीमुळे उत्साहाचे वातावरण असताना उपद्रवी टाळक्यांकडून तलवार, कोयता घेत नंगानाच सुरु आहे.


इतर महत्वाच्या बातम्या