कागल (कोल्हापूर) : विविध कारणांमुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय उचलण्याची धक्कादायक मालिका कोल्हापूर जिल्ह्यात सुरुच आहे. आता या मालिकेत जिल्ह्यातील कागल तालुक्यातील तालुक्यातील तरुणाची भर पडली आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्नाची गाठ बांधलेल्या तरुणाने पत्नीला माहेरी सोडून राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये घडली. रोहित शंकर मोरे (वय 26) असे त्याचे नाव आहे. रोहितच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. 


तीन महिन्यांपूर्वीच विवाह, वडिलांचे महिन्यापूर्वी निधन 


गवंडी काम करणाऱ्या रोहितचे 3 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वडिलांचे वडिलांचे महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. रोहितची आई त्यांच्या माहेरी गणेशोत्सवासाठी गेली होती. रोहितने पत्नीला माहेरी सोडले. त्यामुळे घरी रोहित आणि त्याची आजी असे दोघेच होते. सायंकाळी चारच्या सुमारास रोहितने राहत्या घरात दुसऱ्या माळ्यावर खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यानंतर कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला.


आजरा तालुक्यात तरुणाची आत्महत्या 


दुसरीकडे, आजरा तालुक्यातील माळाप्पा मारुती कुरबर (वय 21, मुळगाव रा. यादगुड, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याने गोठ्यात गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवारीच ही घटना घडली. मल्लिकार्जुन कुरबर यांनी आजरा पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. 


एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या


दुसरीकडे,एकतर्फी प्रेमातून अपयश आल्याने विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) या तरुणाने आत्महत्या केली होती. एकतर्फी प्रेमातून त्याने आयुष्याचा शेवट केला. मंगळवारी ही उघडकीस आली. या घटनेची नोंद चंदगड पोलिसांत झाली आहे. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. 


इतर महत्वाच्या बातम्या