Kolhapur Crime: कॉलेजमधील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण अन् दारु पाजून अत्याचार; दोन आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी
इस्लामपूर येथील शिवनगर येथील एका कॉलनीतील इमारतीच्या फ्लॅटमध्ये 2 आणि 3 नोव्हेंबर 2018 हा प्रकार घडला होता. पीडित अल्पवयीन मुली आणि तिन्ही आरोपी कोल्हापुरात एकाच कॉलेजमध्ये शिकत होते.
Kolhapur Crime: तीन महाविद्यालयीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून मद्य पाजून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपात दोन नराधमांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि साडेआठ हजार रुपये दंडाची शिक्ष सुनावण्यात आली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये आरोपींनी कोल्हापुरातून मुलींचे अपहरण केल्यानंतर इस्लामपूरमध्ये (ता. वाळवा, जि. सांगली) लैंगिक अत्याचार केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो)अंतर्गत आरोपींना शिक्षा सुनावली. हर्षल आनंदा देसाई (वय 24, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) आणि प्रमोद हणमंत शिंदे (वय 24, रा. गांधीनगर, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी अल्पवयीन आहे. त्याच्यावर बालहक्क न्यायालयात खटला सुरू आहे.
मद्यप्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार
इस्लामपूर येथील शिवनगर येथील एका कॉलनीतील इमारतीच्या फ्लॅटमध्ये 2 आणि 3 नोव्हेंबर 2018 हा प्रकार घडला होता. सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुली आणि तिन्ही आरोपी कोल्हापुरात एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. आरोपींनी पीडित मुलींना महावीर गार्डनमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर जबरदस्तीने त्यांना इस्लामपूरमधील भाड्याच्या खोलीत घेऊन गेले. तिथे मुलींना मद्यप्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी मुलींच्या अंगावरील दागिने काढून घेऊन ते कोल्हापुरातील एका सराफाला विकले. त्यातून आलेल्या पैशातून मद्यप्राशन करून आणि गांजा ओढून पुन्हा मुलींचा लैंगिक छळ केला.
दरम्यान, तिन्ही मुली दोन दिवस घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तत्कालिन पोलिस अधिकारी स्मिता पाटील यांना मुलींचे मोबाईल लोकेशन इस्लामपूर असल्याचे आढळले. पोलिसांचे पथक तेथे गेल्यावर दोन्ही आरोपी आणि मुली फ्लॅटमध्ये आढळल्या होत्या. पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव आणि डॉ. प्रशांत अमृतकर यांनी या प्रकरणाचा तपास केला होता व आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील कुलकर्णी यांनी न्यायालयात 19 साक्षीदार तपासले. साक्षी, पुरावे आणि ॲड. कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तिडके यांनी शिक्षा सुनावली.
विनयभंगप्रकरणी दोन वर्षाची सक्तमजुरी
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील इराप्पा मलाप्पा कंकणवाडी (वय 36) याला दोन वर्षे सक्तमजुरी, दोन हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दहा दिवसांपूर्वी त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. एस. ए. राठोड यांनी हा निकाल दिला. गावातील शेतात 10 ऑक्टोबर 2013 रोजी विनयभंग केल्याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली होती. तत्कालीन हवालदारांनी घटनेचा तपास करुन कंकणवाडीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी न्या. राठोड यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाकडून अॅड. नीता चव्हाण यांनी पाच साक्षीदार तपासले.