Kolhapur Crime : आजरा तालुक्यातील खानापुरात सशस्त्र दरोडा; 220 पाळीव डुकरांसह सोनं, तयार काजूगर, रोकड लुटली
Kolhapur Crime: दरोडेखोरांनी गुरव दाम्पत्याचे हात पाय बांधून तोंडाला कापड बांधले. तसेच कोणाला संपर्क करू नये म्हणून मोबाईल फोडून टाकले. मुलगा राजेशने प्रतिकार केल्यानंतर त्यांच्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली.

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) आजरा तालुक्यातील खानापुरात 15 ते 20 जणांच्या टोळीनं तलवारी नाचवत शेतातील घरात सशस्त्र दरोडा टाकला. खानापूर गावच्या माजी सरपंच पूनम प्रल्हाद गुरव यांच्या शेतातील घरावर मंगळवारी मध्यरात्री हा दरोडा पडला. तलवारीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी 220 पाळीव डुकरं, सोनं, तयार काजूगर, काजू बी, रोकड यांसह नऊ लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. गुरव दाम्पत्याला हात पाय बांधून तलवारीचा धाक दाखवून लूट केली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत गुरव यांचा मुलगा राजेश जखमी झाला आहे. दरोडेखोरांनी 220 डुकरे आयशर टेम्पोत भरून आजऱ्याच्या दिशेने फरार झाले. दरम्यान, बेळगावमधील एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
दरवाजा दगडाने तोडून हातात तलवारी आणि रॉड घेऊन 10 ते 15 जण घुसले
प्रल्हाद गुरव हे बँकेत अधिकारी ते कुटुंबासह त्यांच्या शेतात राहतात. त्या ठिकाणीच त्यांचा काजू प्रक्रिया आणि वराहपालन व्यवसाय आहे. मंगळवारी मध्यरात्री गुरव कुटुंबीय झोपी गेल्यानंतर शेडवजा घराचा दरवाजा दगडाने तोडून हातात तलवारी आणि रॉड घेऊन 10 ते 15 जण घुसले. घरात घुसताच त्यांनी गुरव दाम्पत्याचे हात पाय बांधून तोंडाला कापड बांधले. तसेच कोणाला संपर्क करू नये म्हणून मोबाईल फोडून टाकले. यावेळी मुलगा राजेशने दरोडेखोरांना प्रतिकार केल्यानंतर त्यांच्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली.
पूनम गुरव यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही त्यांनी हिसकावून घेत कपाट फोडून त्यामधील सुद्धा दागिने घेतले. साडेसहा तोळे सोने, चांदीचे दागिने, अडीचशे किलो तयार काजूगर तसेच पाचशे किलो काजू बी आणि 25 हजार रोकड, अशी नऊ लाख 17 हजारांची लूट केली. हा सर्व धुमाकूळ पाहून गुरव यांच्याकडे कामासाठी असलेले दशरथ कोरवी आणि त्यांची पत्नी झोपेतून जागी झाली. ते सर्व प्रकार पाहत होते, पण दरोडेखोर पाहून ते हादरून गेले होते. त्यामुळे दरोडेखोर फरार झाल्यानंतर ते शेडच्या दिशेने आले. प्रल्हाद गुरव यांनी सुटका करून घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर तातडीने पोलिसांची पथके रवाना केली.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
