Kolhapur News : स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात पिंपळगावमध्ये महिलांनीच ग्रामसभा बोलवत बालविवाहविरोधात शपथ घेतली. या सभेमध्ये बालविवाहविरोधी ठराव करण्यात आला. अशा प्रकारे ठराव करणारे पिंपळगाव हे पहिलेच गाव आहे. विशेष महिला ग्रामसभा महिलांच्या आवाहनानुसार घेण्यात आली होती. 


यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अँड. दिलशाद मुजावर यांनी  बालविवाह बागडणाऱ्या मुलींवर होणारा आघात असल्याचे मत व्यक्त केले. सरपंच विश्वनाथ कुंभार यांनी तसेच महिलांनी या ग्रामसभेचे नियोजन केले. मुजावर यांनी उपस्थित महिला, मुली, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, मंडळ अधिकारी अंजली घाटनकर यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळगावमध्ये बालविवाह होणार नाही, अशी शपथ दिली. विधवा प्रथा बंद करत विधवांना पुर्णागिणी असे बोलवत त्यांचे सौभाग्यलंकार पतीच्या निधनानंतरही तसेच राहू द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


दिलशाद मुजावर पुढे म्हणाल्या की, अनेक वर्षापासून महिला, मुली तृतीयपंथीयांसाठी काम करत असले, तरी या ऐतिहासिक प्रसंगी मला गावाने बोलावले व अशा भगिनी स्वतः पुढे येऊन असे सांगतात हा प्रसंग मी पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे सांगितले. 


यावेळी बालविवाह तसेच विधवा प्रथेच्या विरोधात एकमताने ग्रामसभेत ठराव करण्यात आला. दुसरीकडे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण विशेषत: कोरोना काळापासून वाढले आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये तब्बल 19 बालविवाह झाल्याचे आढळून आले आहे. लग्‍न करताना वधूचे वय 18 पेक्षा, तर वराचे वय 21 पेक्षा कमी असल्यास बालविवाह समजला जातो.   


इतर महत्वाच्या बातम्या