child marriage kolhapur : कोरोना काळात कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात बालविवाह वाढतच चालल्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार सक्तीचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील गावांमध्ये बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना पदावरुन बाजूला, तर ग्रामसेवकांच्या निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शहरात बालविवाह आढळून आल्यास वॉर्ड स्तरीय समिती अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 


मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल संरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 


यावेळी बोलताना रेखावार म्हणाले की, बालसरंक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांकडून बालविवाह प्रतिबंध अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात कुचराई झाल्यास समितीमधील सदस्यांना जबाबदार धरुन पदावरुन बाजूला अथवा निलंबनाची कारवाई करण्यात येईल. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील व संबंधित समिती सदस्य उपस्थित होते.


तालुका बाल संरक्षण समित्या सक्षम होण्यासाठी तहसीलदारांनी बाल विवाह व अन्य संबंधित विषयांवर दरमहा नियमित आढावा घ्यावा, असेही आदेश त्यांनी दिले. 


वर्षभरात 19 बालविवाह उघडकीस 


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण विशेषत: कोरोना काळापासून वाढले आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये तब्बल 19 बालविवाह झाल्याचे आढळून आले आहे. लग्‍न करताना वधूचे वय 18 पेक्षा, तर वराचे वय 21 पेक्षा कमी असल्यास बालविवाह समजला जातो. अनेक कारणांनी बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन विवाह केल्याच्या घटनांमध्येही अलीकडील काळात वाढ झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या