Kolhapur News : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यदिन अभूतपूर्व उत्साहात पार पडला. घरोघरी तिरंगा मोहीमही हा त्याच उपक्रमाचा भाग होता. कोल्हापूर जिल्ह्यात या मोहिमेतंर्गत 28 लाख घरावर तिरंगा डौलाने फडकला. त्याचबरोबर इतर उपक्रमही आनंदात पार पडले.


या पार्श्वभूमीवर अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोल्हापूरमधील महिपती शंकर संकपाळ (mahipati sankpal from Kolhapur) यांनी केलेला पराक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावा असाच झाला आहे. वयाच्या 64 व्या वर्षी महिपती शंकर संकपाळ यांनी कोल्हापूरचे वैभव असलेल्या नयनरम्य रंकाळ्याला 17 फेऱ्या मारून तब्बल 75 किमी धावण्याचा पराक्रम केला. 


मध्यरात्री 12 च्या सुमाराला सुरू करण्यात आलेला हा उपक्रम सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाला. या पराक्रमाने कोल्हापूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच असा पराक्रम केला गेला आहे.  महिपती संकपाळ यांनी रंकाळा तलावाभोवती 17 प्रदक्षिणा मारत 75 किमीचे अंतर 9 तास 9 मिनिटे 29 सेकंदात पूर्ण केले. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी हा विक्रम करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.


हा अभिनव उपक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना कोल्हापूर मास्टर अॅथलेटिक असोसिएशन व कोल्हापूर वॉकर्स असोसिएशनचे बाळासाहेब भोगम, रघुनाथ लाड, धोंडीराम चोपडे, परशुराम नांदवडेकर, नाना गवळी, अजित मोरे, उदय महाजन, उदय गायकवाड, राजेश पाटील, अविनाश बोकील इत्यादींनी प्रत्येकी दोन ते तीन प्रदक्षिणा त्यांच्यासोबत घालून त्यांना हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. 


अडीच दशकांपासून तिरंगा फडकवणाऱ्या दरेकर कुटुंबियांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट 


दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा फडकावण्याचा सन्मान सर्वसामान्य भारतीयांना मिळाला. मात्र, याला कोल्हापूर जिल्ह्यातील अजित दरेकर कुटुंबीय अपवाद ठरले आहेत. मागील अडीच दशकांपासून स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनाला तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या कोल्हापूर येथील अजित दरेकर यांच्या घरी जावून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले. तसेच कुटुंबियांशी संवाद साधला.


दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी दरेकर आपल्या घरासमोर तिरंगा फडकवतात, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहीम देशभरात राबविण्यात आली. यानिमित्ताने दरेकर कुटुंबीय राबवित असलेल्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घरी जावून त्यांचे कौतुक केले.