Kolhapur News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा फडकावण्याचा सन्मान सर्वसामान्य भारतीयांना मिळाला. मात्र, याला कोल्हापूर जिल्ह्यातील अजित दरेकर कुटुंबीय अपवाद ठरले आहेत. मागील अडीच दशकांपासून स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनाला तिरंगा अभिमानाने फडकवणाऱ्या कोल्हापूर येथील अजित दरेकर यांच्या घरी जावून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले. तसेच कुटुंबियांशी संवाद साधला.


दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी दरेकर आपल्या घरासमोर तिरंगा फडकवतात, ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' मोहीम देशभरात राबविण्यात आली. यानिमित्ताने दरेकर कुटुंबीय राबवित असलेल्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घरी जावून त्यांचे कौतुक केले. 


या उपक्रमाची दखल घेऊन अमृत महोत्सवी वर्षात जिल्हा प्रशासनाकडून दरेकर यांच्या या उपक्रमावर आधारित बनवण्यात आलेल्या चित्रफितीला मिळालेला उत्फूर्त प्रतिसाद ही देशभक्तीची भावना जागृत करणारी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगत दरेकर कुटुंबीयांच्या उपक्रमाचा गौरव केला.


यावेळी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकताना पाहण्यात खरा आनंद मिळत असल्याचे अजित दरेकर यांनी यावेली आपल्या भावना व्यक्त करताना सांगतिले. यावेळी संगीतकार ऐश्वर्य मालगावे, अजित दरेकर व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या