Kolhapur Crime : कोल्हापुरात भरारी पथकाकडून गोवा बनावटीचा 67 लाख 3 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर (Kolhapur News) जिल्हा भरारी पथकाने सापळा रचून मोठी कारवाई करताना गोवा बनावटीचा तब्बल 67 लाख 3 हजार रुपयांचा मद्यसाठी जप्त केला.

Kolhapur Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर (Kolhapur News) जिल्हा भरारी पथकाने सापळा रचून मोठी कारवाई करताना गोवा बनावटीचा तब्बल 67 लाख 3 हजार रुपयांचा मद्यसाठी जप्त केला. भरारी पथकाकडून सुरेश रामजीवन बिश्नोई (वय 24, रा. ढाणी घोरिमाना, जि. बारमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाला उचगाव (ता. करवीर) च्या हद्दीत तावडे हॉटेल समोर चौकात सर्व्हिस रोडवर पाळत ठेवण्यात आली होती. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास संशयित आयशर (MH-08-AP-5080) घेवून येताना आढळून आला. आयशर थांबवून कसून तपासणी केली असता पाठीमागे मोठा मद्यसाठा आढळून आला. यामध्ये गोवा बनावटीचा 180 व 750 मिलीचे 500 बॉक्स आणि बियरचे 120 बॉक्ससह एकूण 620 बॉक्स इतके मद्य मिळून आले.
जप्त केलेल्या वाहनासह एकूण किंमत रुपये 67,03,200 रुपये इतकी असून निव्वळ मद्याची किंमत 52,03,200 रुपये इतकी आहे. सदर गुन्ह्यांमध्ये त्याच्या इतर साथिदारांचा सहभाग आहे का? याबाबत तपास सुरू आहे. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इतर आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले. सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील. दु. निरीक्षक विजय नाईक, दु. निरीक्षक एस. एल. नलवडे, जवान सचिन काळेल, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, जय शिनगारे, यांनी सहभाग घेतला.
15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा कारवाई
दरम्यान, अवघ्या 15 दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने छापेमारी करत गोवा बनावटीचा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छापेमारीची कारवाई करून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. अनिकेत अरूण पाटील (वय 32, रा. प्लॉट क्र. 32/A, शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि इंद्रजित संताजीराव घोरपडे (वय 45, रा.856 ई वॉर्ड, साईनाथ कॉलनी, लाईन बाजार, कोल्हापूर) अशी दोघांची नावे आहेत.
भरारी पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अनिकेत आणि इंद्रजितला ताब्यात घेत कोल्हापुरातील शाहू मिल कॉलनी तसेच पांजरपोळ इंडिस्ट्रिज एरिया या दोन ठिकाणांवर छापेमारी केली. त्यांच्या राहत्या घरात बेकायदा गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठया प्रमाणात साठा सापडला. आरोपींच्या राहत्या घराची कसून तपासणी केली असता सदर घरामध्येमध्येही गोवा राज्य निर्मित उच्च प्रतिच्या विदेशी मद्याने भरलेले 180 व 750 मिलीचे विविध ब्रँडचे 57 बॉक्स इतके मद्य सापडले.
इतर महत्वाच्या बातम्या























