Belgaum News : बेळगावमध्ये नेपाळी पैलवानाने उत्स्फूर्तपणे 'जय महाराष्ट्र' म्हणताच हातातील माईक हिसकावून घेतला!
बेळगाव कुस्तीगीर संघटनेच्या वतीने हिंदवाडीमध्ये कुस्ती आखाड्यात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांसाठी कर्नाटकसह महाराष्ट्र व इतर भागातून पैलवान संघटना सहभागी झाल्या होत्या.
बेळगाव : सीमाभागामध्ये कानडी वरवंटा नवा नसतानाच आता बेळगावमध्ये कुस्ती स्पर्धेत दरम्यान भयंकर प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. बेळगावमध्ये कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये थापा या नेपाळी पैलवानाने सुद्धा सहभाग घेतला होता. थापा पैलवानाने कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जय महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला. त्यामुळे आयोजकांनी त्याच्या हातातील माईक हिसकावून घेत त्याला 'जय महाराष्ट्र' म्हणायचं नाही, असा दम दिला. आयोजकांनी नेपाळी पैलवानाने जय महाराष्ट्र असे म्हणताच जय कर्नाटका म्हणण्यास सांगितलं. इतकंच नाही, जय महाराष्ट्र म्हणून आम्हाला अडचणीत आणशील, असा दम देखील दिला. त्यामुळे कर्नाटकमधील मराठी भाषेविषयी असणारी गळचेपी पुन्हा एकदा समोर आली आहे.
जय महाराष्ट्र म्हणताच आयोजकांचा तीळपापड
बेळगाव कुस्तीगीर संघटनेच्या वतीने हिंदवाडीमध्ये कुस्ती आखाड्यात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांसाठी कर्नाटकसह महाराष्ट्र व इतर भागातून पैलवान संघटना सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी आलेल्या थापा या नेपाळी पैलवानाने शिवाजी महाराज की जय तसेच जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. त्यामुळे कुस्तीगीर संघटनेला त्याचा चांगलाच राग आल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच त्याच्या हातातून माईक काढून घेतला. अरे राजा, जय महाराष्ट्र म्हणू नकोस असं तो बोलला. त्यानंतर कुस्तीसाठी मिळालेल्या सर्व प्रेक्षकांनी विरोध केला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय चालेल
आयोजक म्हणाला की, अरे बाबा इतक्या अडचणी करशील की तुझी जेवढी उंची आहे, तेवढी माझी उंची याठिकाणी करून ठेवतील. माझ्यासोबत जे डॉक्टर आहेत, त्यांची सुद्धा उंची तितकीच करून ठेवतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर चालू शकेल. मात्र, जय महाराष्ट्र म्हणू नको रे बाबा असे त्या थापा पैलवानाला सांगितले.
तुला जय महाराष्ट्राची कावीळ, दीपक शेळकेंचा हल्लाबोल
दरम्यान, या प्रकारानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दीपक शेळके यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, मी पहिल्यांदा त्या थापाचं मी कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज त्याला कळाले आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्याला कळाला. त्या थापाला माझा स्वाभिमानी जय महाराष्ट्र. ते पुढे म्हणाले की, जय महाराष्ट्राचा उच्चार केल्यानंतर तिथल्या एका व्यक्तीला इतका त्रास झाला की, लागलीच त्यांनी त्याच्या हातातला माईक काढून घेतला. त्याला तो म्हणतोय अरे बाबा जय महाराष्ट्र नाही बोलायचं. ते म्हणाले, अरे निर्लज्ज माणसा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलं ते स्वराज्य म्हणजे महाराष्ट्र आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराज येतात तिथे महाराष्ट्र येणारच आणि तो बिचारा नेपाळी नेपाळवरून येऊन तो जय महाराष्ट्र म्हणतोय त्याला महाराजांचं महाराष्ट्र कळतंय आणि तू तर इथला स्थानिक असून तुला जय महाराष्ट्राची कावीळ असल्याची टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, तुझं नशीब चांगलं असून त्या ठिकाणी मी नव्हतो. नाहीतर जय महाराष्ट्र डावलून कशा कुस्त्या घेतोस तेच मी बघितलं असतं. मराठी भाषिकांनी त्या थापाने जय महाराष्ट्र बोलल्यानंतर जो आवाज त्या मैदानात येत होता, त्यावरून तुला समजायला पाहिजे होतं की बेळगाव जय महाराष्ट्र चालतं की अजून दुसरं काही चालतं, पण तुझ्यासारखे लाचार मराठी जोपर्यंत या ठिकाणी अस्तित्वात आहेत तोपर्यंत या मराठी माणसांना खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळांची कमी नाही. मला तुझ्या विचारांची कीव येते.
यापुढे जय महाराष्ट्र तुला म्हणायचं नाही, तर म्हणू नको पण मराठी बोलणं या क्षणापासून सोडून दे. शुद्ध मराठी बोलत होता श्रीकांत देसाई तुझं नाव असं कळालं. नावाप्रमाणे तुझी मातृभाषा मराठी असेल असा अंदाज मी या ठिकाणी लावतो आणि यापुढे मराठी भाषेचा उल्लेख वापर तू स्वतः आणि तुझ्या मित्र परिवाराकडून होणार नाही अशी आशा करतो. जिथे मराठीचा आणि महाराष्ट्राचा सन्मान नाही तिथे मराठी नसली तरी आम्हाला काय हरकत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या