म्हस उधळून रस्त्यावर अन् दुचाकीस्वाराचा हकनाक जीव गेला; कोल्हापुरात रस्त्यावरच्या म्हशी, गायी, कुत्री, घोडी किती जणांचा बळी घेणार?
पाचगावमधून अनेक शेतकरी म्हशी तसेच गायी घेऊन चारण्यासाठी गायरानाकडे येत असतात. मात्र, कोणत्याच प्रकारचे नियंत्रण या म्हशींवर नसते. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो.

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात गुडघाभर खड्ड्यात गेलेल्या रस्त्यातून वाट काढत असताना वाहनधारकांचा जीव मेटाकुटीला येत असतानाच आता मोकाट जनावरे सुद्धा जीव घेऊ लागली आहेत. यामध्ये पाळीव पशुधनाचा सुद्धा समावेश आहे. अवघ्या 10 दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील गिरगावमधील संजय रंगराव कुरणे (वय 53) कोल्हापूरला येत असताना पाचगाव हद्दीत कळंबा फाट्यावर (श्रीकृष्ण सभासदजवळ,पाचगाव) अचानक म्हैस उधळून रस्त्यावर थेट दुचाकीवर आल्याने ते खाली कोसळले. डांबरी रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने हकनाक बळी गेला. त्यामुळे कोणताही दोष नसताना संजय कुरणे यांना जीव गमवावा लागला.
पाचगाव रस्त्यावर म्हशींचा दररोजचा उच्छाद, निर्ढावलेले मालक
पाचगावमधून अनेक शेतकरी म्हशी तसेच गायी घेऊन चारण्यासाठी गायरानाकडे येत असतात. मात्र, या सर्वच शेतकऱ्यांचे कोणत्याच प्रकारचे नियंत्रण या म्हशींवर नसते. त्यामुळे दररोज या मार्गावरून जाणाऱ्यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. म्हैस उधळून मृत्यूमुखी पडलेल्या संजय कुरणे यांच्या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असली, तरी म्हैस कोणाची याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. त्या म्हशींसोबत शेतकरी होता की नव्हता? याबाबतही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे जाब विचारायचा तरी कोणाला? अशी अवस्था कुरणे कुटुंबाची झाली आहे.
कोरोनात मुलगा आणि आता वडिलांचा मृत्यू
संजय कुरणे यांचा दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना महामारीत संजय कुरणे यांच्या अवघ्या विशीतील पोटच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या दु:खातून सावरत नाही तोवर आता संजय कुरणे यांचाही दुर्दैवी अपघाती मृत्यूने कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
कोल्हापुरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
गिरगाव ते पाचगाव मार्गावर गायी म्हशींचा उच्छाद सुरु असतानाच कोल्हापूर शहरातील संभाजीनगर ते पाण्याचा खजिना या मार्गावर चार ते पाच घोडी रस्त्यावर ठाण मांडून आहेत. त्यामुळे कदाचित वाहनांना बिथरून ही घोडी उधळली गेल्यास काय होईल, याची कल्पना न केलेली बरी. घोडी रस्त्यावर ठाण मांडून असतानाच निर्मिती काॅर्नर ते हाॅकी स्टेडियम मार्गावर गायींचा कळप आहे. त्यामुळे त्याठिकाणी सुद्धा तीच अवस्था आहे. काही दिवसांपूर्वी एका वृद्धावर गाढवाने गांधीनगरमध्ये हल्ला केला होता.
मोकाट कुत्री नित्याचीच
कोल्हापूर शहरातील गायी, घोडींचा वावर सुरु असतानाच मोकाट कुत्र्यांची सुद्धा तीच अवस्था आहे. इचलकरंजीमध्ये कुत्र्याने चावा घेण्याची शेकड्याने प्रकरणे होत आहेत. इचलकरंजीमध्येच भटक्या कुत्र्यांनी महिलेचा लचके तोडून जीव घेतला होता. भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांचा सुद्धा फडशा पाडला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























