Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या धुवाँधार पावसाने अनेकांची दाणादाण झाली. कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने हाता तोंडाला आलेल्लया पिकांची नासाडी होण्याची भीती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी तब्बल चार तास पाऊस कोसळला. करवीर, हातकणंगले शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यात पावसाने काल अक्षरश: थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.
राधानगरी धरणात 231.46 दलघमी पाणीसाठा झाला आहे. धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी, रुई व तेरवाड हे तीन बंधारे पाण्याखाली आहेत. यंदाच्या मोसमात कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नव्हती. तसेच जून महिन्यातील अपवाद वगळल्यास पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. तथापि, परतीच्या पावसाने मात्र आता रौद्ररुप धारण केल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.
परतीच्या पावसाने हाहाकार
जिल्ह्यात भात आणि सोयाबीन पिकांच्या मळणीने गेल्या 15 दिवसांपासून वेग घेतला असतानाच परतीच्या पावसाने हाहाकार सुरु केला आहे. त्यामुळे भात, सोयाबीन तसेच भूईमुग पिकांवर विपरित परिणाम झाला आहे. पावसाने शेतांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याने सोयाबीन आणि भूईमुगाला कोंब येण्याची भीती आहे. दुसरीकडे सोसाट्याच्या वाऱ्याने भात पीक शेतात झोपल्याने झडण्यासह पाण्यात कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोसावलेली पिके अशा पद्धतीने संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.
शेतकरी पिके काढण्याच्या तयारीत असतानाच पावसाने खोडा घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनची लागवड हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. दुसरीकडे करवीर, कागल तालुक्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
सहाय्यक कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाऊस पडल्याने धान्य आणि बियाणे यांची वाढ थांबते. गुणवत्ता ढासळते आणि शेतकर्यांना उत्पादनात नुकसान होते. लवकरात लवकर हाताला आलेल्या पिकांची कापणी करावी आणि कापणी केलेली पिके शेडमध्ये ठेवावीत, असा सल्ला आम्ही देत आहोत. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना भुईमूग आणि भात काढणीचा सल्ला दिला आहे.
ऊस गळीत हंगाम लांबण्याची शक्यता
दुसरीकडे पावसाने हाहाकार केल्याने ऊस गळीत हंगाम सुद्धा लांबण्याची शक्यता आहे. राज्यात ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार असला, तरी परतीचा पाऊस थैमान घालत असल्याने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिवारात पाणीच पाणी झाल्याने ऊस वाहतूक करताना मोठ्या संकटांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
- हातकणंगले-46.7
- शिरोळ-12.2
- पन्हाळा-47.3
- शाहूवाडी-38.8
- राधानगरी-20.5
- गगनबावडा-66.7
- करवीर-50
- कागल-20.2
- गडहिंग्लज-8.4
- भुदरगड-15.8
- आजरा-6.1
- चंदगड-2.6
इतर महत्वाच्या बातम्या