Leopard Foothills of Jyotiba Hill : गिरोली-पन्हाळा मार्गावरील सरकाळा परिसरात जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी पुन्हा बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले आहे. बिबट्याच्या ताज्या दर्शनाने ज्योतिबा मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बिबट्याच्या हल्ल्याची कोणतीही घटना अद्याप समोर आलेली नाही. मात्र, मनुष्य-प्राणी संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी  या प्राण्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांमधून होऊ लागली आहे. 


मात्र, वन अधिकाऱ्यांनी या भागामध्ये फार पूर्वीपासून बिबट्याचा अधिवास असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये, असे म्हटले आहे.  


बिबट्याची छायाचित्रे टिपणारे वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव म्हणाले की, रविवारी संध्याकाळी मी माझ्या कुटुंबासह ज्योतिबा मंदिरात गेलो होतो. पन्हाळ्याच्या दिशेने प्रवास करत असताना, रस्त्याच्या कडेला असलेल्या खडकावर 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ विसावलेल्या बिबट्याला पाहून मला भाग्यवान वाटले. या ठिकाणी बिबट्याचा अधिवास असल्याचे मला वर्षानुवर्षे माहीत आहे. बहुतेक स्थानिक रहिवासी देखील याबाबत जागरूक आहेत. भाविक व ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. येथील बिबट्या लहान प्राण्यांची शिकार करतो आणि मानवांवर हल्ला करण्याचा कोणताही हेतू दाखवत नाही.


यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी ज्योतिबा टेकडीच्या पायथ्याशी एका खडकावर विसावलेल्या वाघाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर एका गावकऱ्याने दावा केला होता, की त्याने वाघ पाहिला आहे. पुरावा म्हणून गावकऱ्यांनी अस्पष्ट फोटो आणि व्हिडिओ दाखवले. वनविभागाने मात्र, वाघाचे अस्तित्व नाकारून तो बिबट्या असल्याचा दावा केला होता. 


कोल्हापूर जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये तब्बल 8 पट्टेरी वाघ कॅमेऱ्यात कैद


दुसरीकडे देशभरात आयात केलेल्या चित्त्यांची चर्चा होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये तब्बल 8 पट्टेरी वाघ (Tigers in Kolhapur) कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या वाघांची झलक वनविभागाने (conservation reserves) लावलेल्या 22 ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (Tilari and Dodamarg) येथील जंगलामध्ये वाघांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. हे वाघ गोव्यातील म्हादेई वन्यजीव अभयारण्य आणि कर्नाटकातील काली आणि भीमगड वन्यजीव अभयारण्यातून येतात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली वनपरिक्षेत्रापर्यंत राधानगरीच्या दिशेने वर जातात आणि परत त्याच मार्गाने जातात.


इतर महत्वाच्या बातम्या