Kolhapur Crime : जामिनावर सुटलेल्या गुंडाचा पाठलाग करून गुंडाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील यादवनगरमध्ये 24 सप्टेंबर रोजी घडली होती. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणातील फरार आरोपी श्रीधर उर्फ दादू बाळकृष्ण पोवारच्या (रा. दौलत नगर, राजारामपुरी कोल्हापूर) मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.


फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी पथक तयार करून सदर आरोपीचा शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या. आरोपी श्रीधर आज उजळाईवाडी ब्रिज ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर रोडवर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहा. पोलिस निरीक्षक किरण भोसले, श्रेणी पोसई नेताजी डोंगरे तसेच पोलीस अमंलदार श्रीकांत मोहिते, उत्तम सडोलीकर, वैभव पाटील, शिवानंद मठपती, सचिन देसाई, रणजित पाटील यांनी सापळा रचला.


शहरी बेघर निवास केंद्राजवळ वर्णनावरून एकाला ताब्यात घेतले असता त्याने श्रीधर असल्याचे सांगितले. त्याच्याकडे  चौकशी केली असता त्याने 7 जणांच्या मदतीने  चिन्याच्या खूनाची कबूली दिली. आरोपी श्रीधरविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मृत चिन्यावर 10 ते 12 गुन्हे 


चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकरचा 24 सप्टेंबर रोजी निर्घृण खून झाला होता. मृत चिन्यावर मारामारी, खुनीहल्ला, खंडणी वसुलीचे 10 ते 12 गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. 24 सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास मृत चिन्या हळदकर आणि संशयितांमध्ये दौलतनगर परिसरात वादावादी झाली. याच वादावादीतून चौघांनी चिन्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी तो यादवनगरच्या दिशेने पळत असतानाच हल्लेखोरांनी महावितरण कार्यालयाजवळ गाठले. बेदम मारहाण झाल्याने तो खाली कोसल्यानंतर हल्लेखोरांनी दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या