Heavy rain across Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. कोरडा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातकणंगले परिसरात ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक (57.4 मिमी), तर शाहूवाडी विभागात सर्वात कमी (2.9 मिमी) पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात 10.9 मिमी, तर साताऱ्यात 7.4 मिमी आणि सोलापूरमध्ये 15.8 मिमी पाऊस झाला.


कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी 13 ऑक्‍टोबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाध्यांवर  30 ते 40 किमी प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे. मंगळवारी संध्याकाळी कोल्हापूर शहर आणि आसपासच्या गावांना IMD कडून वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली आणि सखल भागात पाणी साचले. राजारामपुरी, महाद्वार रोड, केएमसी चौक, एसटी स्टँड, व्हीनस कॉर्नर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.


हातकणंगले आणि इचलकरंजी शहरांना जोडणाऱ्या तारदाळ, रुकडी आणि माणगाववाडी गावातील रेल्वेच्या भूयारी मार्गांवर पाणी साचले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मार्ग बंद केल्यामुळे, तारदाळ भूयारी मार्गातून लोक धोकादायकपणे रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसले. 


पेठवडगावमध्ये वीज कोसळल्याने फटाका गोडावून उद्ध्वस्त


दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील फटाका विक्रेते शिकलगार ब्रदर्स यांच्या रामनगरातील गोडावूनच्या खोलीवर मंगळवारी पहाटे वीज पडल्याने भीषण स्फोट झाला. स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्फोटात गोडावूनची खोली जमीनदोस्त झाली. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील काही घरांच्या, बंगल्याच्या खिडक्यांच्या काचा फुटून हजारो रुपयांचे नुकसान झाले. 


मंगळवारी पहाटे सोसाट्याच्या वार्‍यासह ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटाने मुसळधार पाऊस पेठवडगाव शहराला झोडपत होता. सकाळी साडेसातच्या सुमारास विजेचा लोळ रामनगरातील शिकलगार यांच्या बंद गोडावूनवर पडला. यावेळी स्फोट झाल्याने खोलीचे पत्रे, विटा, दगड हवेत उडून शेजारच्या शेतात पडले. विजेचा लोळ पडलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडला होता.


इतर महत्वाच्या बातम्या