Hasan Mushrif ED Raid :'ईडी' कारवाई विरोधात हसन मुश्रीफांची मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल; उद्या सुनावणी
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ईडीकडून दोन महिन्यात तीनदा छापेमारी करण्यात आल्यानंतर तसेच चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे.
Hasan Mushrif ED Raid : माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ईडीकडून दोन महिन्यात तीन वेळा छापेमारी करण्यात आल्यानंतर तसेच चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. हसन मुश्रीफ यांचे वकील प्रशांत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन (writ petition) दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या (14 मार्च) सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील निर्णयानंतर मुश्रीफ ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार की नाही? याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती प्रशांत पाटील यांनी दिली. याबाबत ईडीला नोटीस देऊन माहिती दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
हसन मुश्रीफांचे वकील काय म्हणाले?
वकील प्रशांत पाटील यांनी याचिका दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की "आम्ही नव्याने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. ज्या पद्धतीने सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) छापेमारी सुरु आहे ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. यापूर्वी पुण्यामध्ये या प्रकरणात मुख्य गुन्हा दाखल आहे त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्या प्रकरणात हसन मुश्रीफ आरोपी सुद्धा नाहीत, हे सुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आज आम्ही ईडीला नोटीसमधून माहिती दिली असून उद्या (14 मार्च) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या प्रकरणात निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही हजर होऊ शकत नसल्याची ईडीला माहिती दिली आहे."
प्रशांत पाटील यांनी पुढे सांगितले की, "दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार हसन मुश्रीफ ईडीसमोर हजर होणार की नाही? हे ठरवलं जाईल. पुण्यामध्ये दाखल असलेल्या मूळ गुन्ह्यामध्ये 2 मे 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थगिती दिल्यानंतर उच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानुसार ईडी तपास करु शकत नाही, तरीही हसन मुश्रीफ यांना समन्स बजावण्यात आलं आहे.
आम्ही ईडीला सहकार्य करणार आहोत, लपवण्यासारखं काहीच नाही. कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे याचिकेवर निकाल दिल्यानंतर आम्ही जबाब देण्यासाठी येऊ. आतापर्यतच्या चौकशीत क्लीनचिट मिळाली आहे. या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मुंबई उच्च न्यायालय ठरवेल, असेही त्यांनी नमूद केले.
हसन मुश्रीफ कागलमध्ये प्रकटले
ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ तब्बल 52 तासांनी कागलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी समन्सवर मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली व अन्य कोणत्याही प्रश्नांना उत्तरे न देता निघून गेले. मुश्रीफ म्हणाले की, "ईडीचे पथक घरी येऊन गेले. ईडीने नोटीस पाठवली आहे. टीव्हीवर घरच्यांची अवस्था दिसल्याने मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. ईडीकडून नोटीस आल्याने वकिलांना ईडीकडून मुदतवाढ घेण्यास सांगितलं आहे. मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाअखेर असल्याने त्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी आहे. त्यामुळे ईडीच्या समन्सला उत्तर देण्यासाठी महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. पहिल्या केसमध्ये केसमध्ये माझे नाव नव्हते. त्यामुळे ईडीला उत्तर देऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल."
इतर महत्वाच्या बातम्या